साईमत/ जिल्हा प्रतिनिधी/ जळगाव :
खान्देशातील विशेषतः जळगाव जिल्ह्यातील वारकऱ्यांना आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घडण्यासाठी केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांनी “भुसावळ-पंढरपूर-भुसावळ” मोफत विशेष रेल्वे गाडीचे नियोजन केले आहे. त्यांनी सुरू केलेल्या मोफत रेल्वेगाडीच्या सुविधेची यंदा दशकपूर्ती आहे. बुधवारी, १७ जुलै रोजी आषाढी एकादशीसाठी रेल्वेगाडी भुसावळ स्थानकावरून मंगळवारी, १६ जुलै रोजी दुपारी एक वाजता निघेल तर पंढरपूरहून १७ जुलैला रात्री १० वाजता परतीचा प्रवास होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांनी दिली.
जळगाव जिल्ह्यातून हजारो वारकरी दरवर्षी आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. जळगाव जिल्ह्यातून मुक्ताईनगरहून संत मुक्ताबाईंच्या पालखीसह जळगावातील श्रीराम मंदिर संस्थानची मुक्ताबाई रामपालखी आणि अमळनेर येथील सखाराम महाराज संस्थानची पालखी अशा तीन पायी दिंड्या दरवर्षी पंढरीला जातात. ज्यांना पायी जाणे शक्य नसते, असे हजारो भाविक, वारकरी रेल्वे अथवा एसटीने दर्शनाला जातात.
ज्यांना पायी जाणे शक्य नाही, अशा वारकऱ्यांनाही पंढरपूरला जाता यावे आणि विठ्ठलाचे दर्शन घेता यावे, म्हणून रक्षाताई खडसे यांनी २०१४ ला प्रथमच खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्याचवर्षी भुसावळहून पंढरपूरसाठी विशेष व मोफत रेल्वेगाडीची सुविधा उपलब्ध करून दिली होती. दरवर्षी आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी ही रेल्वेगाडी निघून एकादशीला पंढरपूरला पोहचते. दिवसभर भाविकांनी दर्शन घेतल्यानंतर पंढरपूरहून निघून ती भुसावळला येते.
दहा वर्षांपासून अविरत उपक्रम सुरू
केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्या उपक्रमास खान्देशातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दहा वर्षांपासून हा उपक्रम अविरतपणे सुरू आहे. यंदा मोफत रेल्वे सुविधेची दशकपूर्ती आहे. यंदाही आषाढी एकादशीनिमित्त भुसावळ स्थानकावरून ही रेल्वेगाडी मंगळवारी दुपारी दीडला निघेल. १७ जुलैला पहाटे साडेतीनला पंढरपूरला पोहचेल. दिवसभर भाविकांनी दर्शन घेतल्यानंतर १७ जुलैला ही विशेष रेल्वेगाडी रात्री दहाला पंढरपूरहून निघून दुसऱ्या दिवशी गुरुवारी (ता. १८) भुसावळ स्थानकावर दुपारी एकला पोहचणार आहे.
हजारो वारकऱ्यांचे लाभले आशीर्वाद
आषाढी एकादशीला भाविकांसह वारकऱ्यांना विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागते. पायी जाणे आणि प्रवासाचा खर्च करणे काही भाविकांना शक्य होत नाही. अशा भाविकांसाठी दहा वर्षांपूर्वी पहिल्यांदा खासदार झाल्यानंतर मोफत रेल्वे सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार आला. तो प्रत्यक्षात अंमलात आणला. दहा वर्षापासून अविरतपणे सुरू असलेल्या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक वारकऱ्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्यांना यानिमित्त विठुमाउलीचा आणि मला हजारो वारकऱ्यांचे आशीर्वाद लाभले.
-रक्षाताई खडसे, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री