एरंडोल : प्रतिनिधी
तालुक्यातील तीन तरुण सोमवारी रामेश्वर तीर्थक्षेत्राजवळील नदीत बुडाले होते. त्यानंतर पोलीस प्रशासन आणि आपत्ती विभागाचे पथक घटनास्थळी रवाना झाले होते. घटनेची माहिती मिळताच परिविक्षाधीन उपविभागीय अधिकारी पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. पट्टीच्या पोहणाऱ्या तरूणांकडून बुडालेल्या तरुणांचा शोध घेतला जात असताना दोन तरुणांचे मृतदेहच हाती आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. तिसऱ्या बेपत्ता तरुणाचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले. सागर अनिल शिंपी, अक्षय शिंपी आणि पियुष रवि शिंपी (तिन्ही रा. एरंडोल) अशी बुडालेल्या तीनही तरुणांची नावे आहेत. हे तीनही तरुण एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
सविस्तर असे की, एरंडोल शहरातील भगवा चौकातील काही तरूण हे सोमवारी, २१ ऑगस्ट रोजी सकाळी ४ वाजता वाहनातून जळगाव तालुक्यातील गिरणा, तापी आणि अंजनी नदीचा एकत्रित त्रिवेणी संगमावरील रामेश्वर महादेव मंदिरावर दर्शनासाठी गेले होते. दुपारी साडेतीन वाजता पोहण्यासाठी गेलेले पियुष रवि शिंपी, सागर अनिल शिंपी आणि अक्षय शिंपी हे तिघे पाण्यात बुडाल्याची घटना घडली. ही घटना घडल्यानंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. बुडालेल्या तिघांपैकी दोन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे.
एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश
पोलीस प्रशासन आणि आपत्ती विभागाचे पथक घटनास्थळी रवाना झाले होते. पट्टीच्या पोहणाऱ्या तरूणांकडून बुडालेल्याचा शोध घेणे सुरू होतेे. घटनेची माहिती मिळताच परिविक्षाधीन उपविभागीय अधिकारी पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. एरंडोल शहरातून कावड यात्रेनिमित्त क्षेत्र रामेश्वर येथे काही तरूण गेले होते. येथील तिवेणी संगमावर काही तरूण पोहत असतांना एकाच कुटुंबातील तीन जण बुडाल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. त्यानुसार रामेश्वर येथे बुडालेल्या तीनही मुलांचा शोध घेण्यासाठी धुळे येथील एसडीआरएफची टीम आणि पोलीस प्रशासनाची टीम घटनास्थळी रवाना केली होती. त्यात दोन जणांचा मृतदेह सापडण्यात यश आले आहे. तिसऱ्याचा शोध सुरु असल्याचे सांगण्यात आले.