सौरभ ज्वेलर्स दुकानातील दरोड्यातील तीन जणांना अटक

0
76

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

शहरातील सराफ गल्लीतील भवानी मातेच्या मंदिरासमोर असलेल्या सौरभ ज्वेलर्स नावाच्या दुकानाच्या मागच्या बाजूने येत दोन कर्मचाऱ्यांना चॉपरचा दाखवून सोने लुटणाऱ्या सहा दरोडेखोरांपैकी तीन दरोडेखोरांना अटक करण्यात शनिपेठ पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. त्यातील एकाला पुण्यातून तर उर्वरित दोन जणांना शहरातील राजीव गांधी नगरातून अटक केली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सागरसिंग जीवनसिंग जुन्नी, रणजितसिंग जीवनसिंग जुन्नी आणि लकीसिंग जीवनसिंग जुन्नी (सर्व रा. राजीव गांधी नगर, जळगाव) अशी अटक केलेल्या तीन दरोडेखोरांची नावे आहेत. तिघे दरोडेखोरे हे सख्खे भाऊ असल्याचे सांगण्यात आले.

सविस्तर असे की, जळगाव शहरातील सराफ बाजारमधील भवानी मातेच्या मंदिरासमोर सौरभ ज्वेलर्स दुकान आहे. या दुकानात सोने आणि चांदी खरेदीविक्री केली जाते. २० मे रोजी पहाटे ३.३० ते ४.१५ वाजेच्या दरम्यान तीन दुचाकींवर आलेल्या अज्ञात सहा दरोडेखोरांनी सौरभ ज्वेलर्स दुकानाच्या पाठीमागून येऊन मागचे चॅनल गेट कटरने तोडले. त्यानंतर लाकडी दरवाज्याच्या लहान खिडकीतून आत प्रवेश केला. दरम्यान या दुकानात नेहमी झोपणारे दोन कर्मचारी यांना लोखंडी चॉपरचा धाक दाखवत शांत बसण्याचे सांगितले आणि इतरांनी कटरच्या सौरभ ज्वेलर्स दुकानाच्या मुख्य दरवाजाचे लॉक तोडले व आत प्रवेश केला. दुकानातून दरोडेखोरांनी सोन्याचे-चांदीचे दागिने, चांदीचे शिक्के व इतर मुद्देमाल असा ३२ लाख २९ हजार ५७४ रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्‍वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप गावित तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्यासह पथक दाखल झाले. पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली. त्यात दोन पथक तयार करून एक जळगावात आणि एक दुसरे पुण्याला रवाना केले. पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे सागरसिंग जीवनसिंग जुन्नी आणि लकीसिंग जीवनसिंग जुन्नी यांना जळगावातून अटक केली तर रणजितसिंग जीवनसिंग जुन्नी याला पुण्यातून अटक केली आहे. दरम्यान, अटक केलेले तीनही दरोडेखोर हे सख्खे भाऊ आहेत तर इतर फरार झालेले दरोडेखोर हे त्यांचे नातेवाईक असल्याचे सांगितले जात आहे. या गुन्ह्यातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

यापूर्वी दोघांना केले होते हद्दपार

दरोड्यातील सागरसिंग जुन्नी आणि रणजितसिंग जुन्नी या दोघांवर चोरी, हाणामारी, धारदार शस्त्र वापरून दमदाटी करणे असे वेगवेगळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे पोलिसात दाखल आहेत. त्यामुळे या दोघांना डिसेंबर २०२२ मध्ये जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी काढले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here