मेहरूण तलावात आंघोळीला गेलेले तिघे वाचले, एकाने जीव गमावला

0
73

जळगाव : प्रतिनिधी
मेहरुण तलावामध्ये आंघोळीसाठी गेलेल्या शाहू नगर परिसरातील १३ ते १४ वर्षीय चार मुले पाण्यात बुडून गटागंळ्या खाऊ लागले. त्यापैकी तिघांना वाचविण्यात यश आले, मात्र ईशान शेख वसीम (१३, रा. शाहू नगर) या मुलाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार, २९ डिसेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास मेहरुण तलाव परिसरात घडली.
शहरातील शाहू नगर परिसरात राहणारे ईशान शेख, मोईन खान अमीन खान (१३), अयान तस्लीम भिस्ती (१३) व असलम शेख सलाउद्दीन (१३) हे चौघे जण शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास मेहरुण तलाव परिसरात आंघोळीसाठी गेले. चौघेही पाण्यात उतरले व काही वेळातच ते गटांगळ्या खाऊ लागले. हा प्रकार आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात आला. त्या वेळी ते मदतीसाठी धावले. यातील मोईन खान, अयान भिस्ती व असलम शेख हे तिघे जण लवकर हाती लागले. त्यांना बाहेर काढून त्यांच्या पोटातून पाणी काढण्यात आले. त्यानंतर ईशान सापडला. चौघांनाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. तेथे ईशान याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर चारही मुलांचे नातेवाईक व परिसरातील नागरिक मेहरुण तलाव परिसर व रुग्णलयात पोहचले होते. त्यामुळे दोन्ही ठिकाणी गर्दी झाली होती. तसेच ईशानच्या मृत्यूची वार्ता कानी पडताच नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्यासह त्यांचे सहकारी घटनास्थळी व रुग्णालयात पोहचले.

एकुलता एक मुलगा
मयत ईशानचे वडील पेंटर असून आई गृहिणी आहे. शेख दाम्पत्याला दोन मुली असून ईशान हा एकुलता एक मुलगा होता. एकुलता एक मुलगा व बहिणींचा लाडका भाऊ गेल्याने शेख कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here