दोन सख्ख्या भावांसह तिघांचा अपघातात मृत्यू

0
33

मनुदेवीच्या दर्शनाला जाणाऱ्या चौघांवर काळाचा घाला, यावल-चोपडा रस्त्यावरील घटना

साईमत/चोपडा/विशेष प्रतिनिधी

सातपुड्यात वसलेल्या मनुदेवीचे दर्शन घेण्यासाठी व भंडारा देण्यासाठी तिघांवर काळाने घाला घातला आहे. यावल- चोपडा रस्त्यावर कारचे टायर फुटल्याने झालेल्या अपघातात धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील निजामपूर येथील तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी, ८ ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली. दरम्यान, अपघातात कारचालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सविस्तर असे की, धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील निजामपूर येथील वाणी कुटुंब हे यावल तालुक्यातील सातपुडा निवासिनी मनुदेवी याठिकाणी नवरात्रीनिमित्त दरवर्षी भंडारा देतात. त्यानुसार नवरात्री सुरु असल्याने ठरल्याप्रमाणे मंगळवारी, ८ ऑक्टोंबरला सकाळी वाणी कुटुंबातील शैलेश श्रीधर वाणी (वय ३४), निलेश श्रीधर वाणी (३०) हे दोन भाऊ आणि त्यांच्या सोबत जितेंद्र मुरलीधर भोकरे (वय ४७) हे कारने मनुदेवी येथे भंडारा देण्यासाठी सकाळी निघाले होते. अशातच चोपडा-नाशिक ही शिवशाही बस चोपडा बस आगारातून सकाळी सहा वाजता निघाली होती. काही वेळातच चोपड्यापासून पाच कि.मी. अंतरावरील सूतगिरणीजवळ शिवशाही बसची समोरून येणाऱ्या सुझुकी रिच (क्र.एमएच १४ एफएम ७२०२) कारचे टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटल्यावर ती शिवनेरी बसला धडकली. काही किलोमीटर अंतरावर मनुदेवी मंदिर असतानाच त्यांच्या कारचा अपघात घडला.

जखमी कार चालकावर उपचार सुरु

अपघातात वाणी बंधूसह जितेंद्र भोकरे ह्या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तसेच कारचा चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. अपघाताची माहिती मिळताच यावलचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. घटनेचा पंचनामा करुन अपघाताची नोंद करण्याचे काम सुरु होते.

निजामपूर गावात पसरली शोककळा

अपघातात साक्री तालुक्यातील निजामपूर येथील वाणी परिवारातील दोन्ही सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती गावात कळताच सर्वत्र शोककळा पसरली होती. परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला. कुटुंबियांनी हंबरडा फोडल्याचे चित्र होते. दोन्ही भावांवर मंगळवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here