कुढापा चौकात अग्नितांडव; शॉर्टसर्किटनंतर सिलिंडर फुटून मोठी दुर्घटना
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
जुन्या जळगावातील कुढापा चौक परिसर रविवारी सकाळी भीषण स्फोट आणि आगीच्या तांडवाने अक्षरशः हादरून गेला. सकाळी सुमारे १० वाजेच्या सुमारास एका राहत्या घरात घरगुती गॅस सिलिंडरचा प्रचंड स्फोट होऊन लागलेल्या आगीत तब्बल तीन घरे जळून खाक झाली. काही क्षणांतच धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळांनी परिसर व्यापला आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
शॉर्टसर्किटनंतर भीषण स्फोट
प्राथमिक माहितीनुसार, कुढापा चौकात निलेश शंकर शिरसाट आणि बापू शंकर शिरसाट यांच्या घरात अचानक आग लागली. सुरुवातीला शॉर्टसर्किट झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून, त्यानंतर घरातील गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज इतका तीव्र होता की, आजूबाजूच्या घरांच्या भिंती हादरल्या. लाकडी पार्टिशन असलेल्या घरांमुळे आगीने काही क्षणांतच विक्राळ रूप धारण केले आणि शेजारील दोन घरांनाही आपल्या कचाट्यात घेतले.
संसाराची राखरांगोळी
या आगीत शिरसाट कुटुंबीयांचा संपूर्ण संसार डोळ्यांदेखत जळून खाक झाला. कपाटात ठेवलेली रोख रक्कम, सोन्याचे दागिने, घरगुती साहित्य आणि महत्त्वाची कागदपत्रे आगीत भस्मसात झाली. काही वेळातच उभे आयुष्य राखेत परिवर्तित झाल्याचे पाहून कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली; मात्र आगीची तीव्रता एवढी होती की, सुरुवातीला कोणालाही जवळ जाणे शक्य झाले नाही.
अग्निशमन दलाची शर्थीची धडपड
घटनेची माहिती मिळताच जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे पाच बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अरुंद रस्ते आणि धुराचे दाट लोट यामुळे जवानांना सुरुवातीला अडचणींचा सामना करावा लागला. तरीही शर्थीचे प्रयत्न करत त्यांनी आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले. सुदैवाने, या भीषण दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा गंभीर दुखापत झाली नाही, हीच मोठी दिलासादायक बाब ठरली.
प्रशासनाकडून मदतीचे आश्वासन
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक पियुष कोल्हे यांनी घटनास्थळी भेट देऊन आगग्रस्त कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यांनी तातडीने शासकीय मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, परिसरातील नागरिकांनीही आगग्रस्तांना आर्थिक व वस्तूरूपाने मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
या भीषण घटनेमुळे जुन्या जळगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी विद्युत यंत्रणेची तपासणी आणि गॅस सुरक्षेबाबत जागरूकता वाढविण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
