जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
येथील स्थानिक गुन्हे शाखेने बकरीसह बोकड चोरी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करत ३ संशयित आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल आणि गुन्ह्यासाठी वापरलेल्या दोन मोटरसायकली जप्त केल्या आहेत.
सविस्तर असे की, शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्यात सैय्यद परवेज सैय्यद आसिफ यांनी ९ सप्टेंबर रोजी फिर्याद दिली होती. २७ ऑगस्ट रोजी त्यांचा ७ हजार रुपये किमतीचा बोकड आणि आवेश शेख यांची ६ हजार रुपये किमतीची बकरी चोरीला गेल्याचे त्यांनी सांगितले. अशा तक्रारीवरून शनिपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचा तपास करत असताना, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल आणि त्यांच्या पथकाने संशयित आरोपी गणेश वासुदेव जाधव (वय २०), गणेश अशोक पाटील (वय २१) आणि अक्षय विजय वंजारी (वय २३) यांना ताब्यात घेतले. सर्व संशयित आरोपी जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील रहिवासी आहेत.
पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केल्यावर त्यांनी बकरी आणि बोकड चोरी केल्याची कबुली दिली. तसेच त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतूनही ३ बकऱ्या चोरल्याचे सांगितले. आरोपींनी चोरीचा बोकड आणि बकरी राहुल रतन राऊळकर नावाच्या खाटीक व्यक्तीला विकल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून बकरी जप्त केली आहे.तसेच बोकडाची रोख रक्कम हस्तगत केली आहे. संशयित आरोपींना पुढील तपासासाठी शनिपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. शरद बागल, स.फौ. अतुल वंजारी, पो.हे.को.प्रवीण भालेराव, मुरलीधर धनगर, विजय पाटील, अक्रम शेख, नितीन बाविस्कर, पो.ना. किशोर पाटील, पो.को. रतनहरी गिते, सिद्धेश्वर डापकर, प्रदीप चवरे, रवींद्र कापडणे यांनी केली.



