साईमत जळगाव प्रतिनिधी
शहरातील मेहरूण परिसरातून एका तरुणाची दुचाकी चोरून नेणाऱ्या संशयित आरोपीला इतर चोरीच्या दुचाकींसह एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी सकाळी 10 वाजता अटक केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष शांताराम सपकाळे (रा. जोशीवाडा), मेहरूण असे अटक केलेल्या दुचाकी चोरट्याचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती आहे की, शहरातील मेहरूण परिसरात असलेल्या विठ्ठल मंदिराजवळील कल्पेश लहू कोल्हे या तरुणाची 20 जुलै रोजी त्याच्या राहत्या घरासमोर लावलेली दुचाकी (एमएच 15 डीजे 6156) मध्यरात्री चोरट्यांनी चोरून नेली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही दुचाकी संशयित आरोपी संतोष शांताराम सपकाळे रा. जोशीवाडा, मेहरूण याने चोरून नेल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी त्याला दुचाकीसह ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने इतर चोरीच्या दोन दुचाकी चोरी केल्याचे कबुली दिली व दोन्ही दुचाकी काढून दिल्या. ही कारवाई पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलीस हेडकॉन्स्टेबल अल्ताफ पठाण, रामकृष्ण पाटील, गणेश शिरसाळे, पोलीस नाईक विकास सातदिवे, किशोर पाटील, योगेश बारी यांनी केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे करीत आहे.