ब्राह्मणशेवगेला भीषण दुष्काळ परिस्थितीतही हजारो झाडांना मिळतेय ‘जीवदान’

0
21

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील ब्राह्मणशेवगे येथे सामाजिक वनिकरण विभाग, ग्रामपंचायत व लोकसहभागातून सामाजिक कार्यकर्ते, जल व पर्यावरण प्रेमी सोमनाथ माळी यांच्या प्रयत्नातून व संकल्पनेतून निसर्गटेकडी परिसरातील पडीक व ओसाड, मुरमाड २५ हेक्टर क्षेत्रावर २०२१ पासून टप्प्याटप्प्याने वृक्षारोपण करण्यात येत आहे. मागीलवर्षी वरुणराजा रुसल्यामुळे भीषण दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्यासाठी टँकरने पाणी आणावे लागत आहे. अशा भीषण परिस्थितीत लावलेले झाडे कशी वाचवायची हा प्रश्‍न पडला होता. ऐन पावसाळ्यात झाडांना पाणी देण्याची आवश्‍यकता निर्माण झाली होती. अशातच सेवा सहयोग फाउंडेशनचे गुणवंत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑक्टोबर महिन्यापासून झाडांना पाणी देण्यास सुरवात करण्यात आली.

नाईकनगर येथील किशोर नामदेव चव्हाण, विलास गोकुळ चव्हाण हे विहिरीवरुन टँकरने पाणी झाडांना देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. मार्च, एप्रिल, मे महिण्यात आग ओकणाऱ्या सुर्यापासून झाडांना नियमित व मुबलक प्रमाणात पाणी दिले जात असल्याने हजारो झाडांना ‘जीवदान’ मिळाले आहे. मे अखेर रणरणत्या उन्हातही झाडांची परिस्थिती खुपच चांगली आहे. यासाठी सेवा सहयोग ग्रामोदयचे गुणवंत सोनवणे, महेश चव्हाण, तुषार निरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल पाटील, पंकज राठोड, प्रवीण राठोड आदींचे सहकार्य लाभत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here