शेंदुर्णीतील रथोत्सवाचे हजारो भाविकांनी घेतले दर्शन

0
9

विठ्ठलाचे दर्शन घेऊन प्रतिस्पर्धी उमेदवारांनी विजयासाठी घातले साकडे

साईमत/जामनेर/प्रतिनिधी

खान्देशचे प्रति पंढरपूर म्हणून ओळख असणाऱ्या शेंदुर्णी नगरीत संतश्रेष्ठ कडोजी महाराज यांनी प्रारंभ केलेला विठ्ठल रुक्मिणी २८० वा रथोत्सव व यात्रोत्सव सोहळा शुक्रवारी, १५ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात आला. यानिमित्त सध्या सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीतील प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपाचे गिरीष महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दिलीप खोडपे हे एकत्र आले. त्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेऊन विजयासाठी साकडे घातले.

रथाची ब्रम्हवृंदांच्या मंत्र घोषात संतश्रेष्ठ कडोजी महाराज संस्थानचे ८ वे गादी वारस ह.भ.प. शांताराम महाराज भगत, मंत्री गिरीष महाजन, माजी जि. प. अध्यक्ष दिलीप खोडपे सर, प्रवीण गरुड, भाजपचे नेते संजय गरुड, सरोजिनी गरुड, गोविंद अग्रवाल, अमृत खलसे, माजी नगराध्यक्षा विजया खलसे आदी मान्यवरांच्या हस्ते सकाळी ११ वाजता महापूजासह आरती करण्यात आली. १७४४ च्या कार्तिक शुद्ध वैकुंठ चतुर्दशीला प्रारंभ झालेल्या रथोत्सवाचा वारसा आजही भक्तिभावाने साजरा केला जातो. आज त्रिविक्रम भगवान यांच्या रथाचे मनोभावे पूजन केले. हजारो भक्तांच्या उपस्थितीत हा धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

रथोत्सवानिमित्त सोन नदीच्या काठावर भरते पंधरा दिवस यात्रा

सोन नदीच्या काठावर रथोत्सवानिमित्त भव्य यात्रा भरली आहे. त्यात हॉटेल्स, करमणुकीचे खेळ, विविध दुकाने, सिनेमागृहे, तमाशा मंडळे आहे. यामुळे १५ दिवस मोठी यात्रा भरत असते. त्यात लाखों रुपयांची व्यवसायात उलाढाल होत असते. शेंदुर्णीकर नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणानिमित्त बाहेरगावी असणारे शेंदुर्णीकर आवर्जुन उपस्थित राहतात. माहेरवाशीण मुली, जावाई रथोत्सवाला हमखास येतात. भाविकांनी रथोत्सव व पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संतश्रेष्ठ कडोजी महाराज संस्थानचे ८ वेळ गादी वारस ह. भ. प. शांताराम महाराज भगत, शेंदुर्णी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विवेक धांडे, पहुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्यासह ग्रामस्थांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here