गुरूंचे तंतोतंत पालन करणाऱ्यांना होते भगवंताचे दर्शन : श्याम चैतन्य महाराज

0
4

गारखेडा खुर्दतील कार्यक्रमात रामायणातील विविध दाखले देत उपस्थितांचे केले प्रबोधन

साईमत/जामनेर/प्रतिनिधी

शबरी मातेला गुरूंनी सांगितले की, एक दिवस श्रीरामचंद्र भगवान तुला दर्शन देतील आणि तू धन्य होशील. हा शब्द शबरी मातेने आयुष्यभर पाळला. शबरी माता भिल्ल समाजाची असूनही भगवंतावर तिची निष्ठा होती. तिच्या अतूट निष्ठेमुळे श्रीराम प्रभूंनी शबरी मातेला दर्शन दिले. शबरी मातेने चाखून दिलेली उष्टी बोरेही ग्रहण केली. असा रामायणात उल्लेख आहे. त्याचप्रमाणे आपल्या गुरूंवर असलेली श्रद्धा आणि निष्ठा त्यांनी दिलेला शब्द, वचन यांचे तंतोतंत पालन करणाऱ्यांना भगवंताचे दर्शन होते, असे प्रबोधनात्मक प्रतिपादन श्याम चैतन्य महाराज यांनी केले. जामनेर तालुक्यातील गारखेडा खुर्द येथे बुधवारी कोजागिरी पौर्णिमा तसेच शबरी माता जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात रामायणातील विविध दाखले देत उपस्थितांचे त्यांनी प्रबोधन केले. त्यावेळी ते बोलत होते.

भगवंताची भक्ती करताना जात, पात, धर्म, उच नीच, हा भेदभाव पाहिला जात नाही. सुसंस्कृत मात्र अशिक्षित असलेल्या भिल्ल समाजावर आज धर्मांतराचे आक्रमण होत आहे. त्या आक्रमणाला आपण बळी पडता कामा नये. शबरी माता अशिक्षित असूनही तिने आपला धर्म सोडला नाही. गुरुंनी सांगितलेला शब्द आयुष्यभर तिने पाळला. अशा शबरी मातेचा आदर्श आपण घ्यावा, असे आवाहनही श्याम चैतन्य महाराज यांनी केले. कार्यक्रमाला गंगापुरी, गारखेडा परिसरातील समस्त ग्रामस्थ, भिल्ल समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here