साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने चोरी करुन माल घेऊन जाणाऱ्या व्यक्तींना वाहनासह ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून जप्त केलेला पाईप आणि वाहन अंदाजे २ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यापुढे कोणी संशयित व्यक्ती चाळीसगाव शहरात फिरत असल्यास त्याची माहिती तात्काळ पोलीस स्टेशनला द्यावी. यामुळे चोरीच्या गुन्ह्यांना पायबंद घालण्याकामी पोलिसांना मदत होईल. तसेच ‘चाळीसगाव शहर सुरक्षित शहर’ राहील, असे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी दिली.
सविस्तर असे की, येथील शहर पोलीस स्टेशनने यंदा २०२४ हे वर्ष ‘चाळीसगाव शहर सुरक्षित शहर’ संकल्पनेखाली काम सुरु केले आहे. संकल्पनेच्या आधारे चाळीसगावच्या नागरिकांमध्ये सुरक्षेकामी जनजागृती करण्यात येत आहे. त्याचबरोबर चाळीसगाव शहर पोलिसांकडून मोक्याच्या ठिकाणी बँका, सराफ बाजार, मुख्य मार्केट, बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन परिसरात गस्त करुन संशयितांवर नजर ठेवण्यात येत आहे. तसेच नागरिकांना जास्तीत जास्त सी.सी.टी.व्ही. कॅमेरे घराच्या बाजुला आणि परिसरात लावण्याबाबत आवाहन केले आहे. त्यालाही नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चाळीसगाव शहरात रात्री रिक्षा चालकांनाही कोणी संशयित व्यक्तीला प्रवासी म्हणून घेवून जात असल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती देणे कामी प्रोत्साहन देण्यात आले आहे. चाळीसगाव शहरातील दर्ग्यावर नियमित साध्या वेशात वॉच ठेवून गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
तसेच चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाची नव्याने रचना केली आहे. पथकास पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चोरीच्या गुन्ह्यांना आळा बसण्याकामी सूचना दिल्या आहेत.
अशातच ४ जानेवारी रोजी स.फौ. शशीकांत महाजन, चा.पो.ना.नितीश पाटील, पो.शि.संदीप पाटील तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पो.हे.कॉ. प्रशांत पाटील, पो.ना. दीपक पाटील, पो.शि. अमोल भोसले, अजय पाटील, नंदकिशोर महाजन, मोहन सूर्यवंशी यांना पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी रात्रीची गस्त दरम्यान संशयित वाहनांची तपासणी आणि खात्री करुन कारवाई करण्याकामी सूचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे पथक गस्त करत असतांना पोलीस नाईक दीपक पाटील यांना रात्रीच्या सुमारास धुळे रस्त्यावरील डेराबर्डी परिसरातील साने गुरुजी शाळेसमोर रस्त्यावर मेहुणबारे गावाकडून चाळीसगाव शहराकडे एक टाटा एस (छोटा हत्ती) वाहन भरधाव वेगाने येतांना दिसले. तेव्हा वाहन चालकास त्यांनी थांबविण्याचा इशारा केला. परंतु चालकाने त्याच्या ताब्यातील टाटा एस वाहन न थांबविता भरधाव वेगाने चाळीसगाव शहराकडे चालवित नेले. तेव्हा पोलीस पथकाचा त्या वाहनावर अधिक संशय बळावल्याने त्यांनी वाहनाचा पाठलाग करुन वाहनास पुन्शी पेट्रोल पंपाच्यापुढे वाहनास थांबविले. त्या वाहनामध्ये मागे तीन जण बसलेले होते. त्यांनी पोलिसांना पाहताच त्यापैकी दोन जण अंधाराचा फायदा घेऊन वाहनातून उतरुन पळुन गेले. तसेच वाहन चालक आणि त्याच्या शेजारी तीन जण बसलेले होते. पोलीस पथकाने वाहनाची तपासणी केल्यावर त्या वाहनात शहरात जल पुरवठा वाहिनीसाठी वापरण्यात येणारा, लोखंड मिश्रीत बिड धातुचा एक पाईप तसेच त्या पाईपाचे तुकडे दिसले. पोलीस पथकाने त्यांना पाईप कोठुन आणला याबाबत आणि पळुन गेलेल्या व्यक्तींबाबत विचारपूस केली. तेव्हा ते उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागले. तेव्हा पथकातील कर्मचाऱ्यांना पाईप हा कोठून तरी चोरी करून आणल्याची खात्री झाली. त्यांना वाहनासह ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला हजर करून त्यांच्यावर मुंबई पोलीस कायदा १२४ भा.दं.वि. कलम ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
ताब्यात घेतलेल्यांमध्ये अशोक विश्वनाथ पवार (वय २७, चालक), वाल्मिक साहेबराव सोनवणे (वय ४५, दोन्ही रा.पाण्याच्या टाकीजवळ, डेराबर्डी, चाळीसगाव), राहुल रावसाहेब पाटील (वय ३१, रा. भोरस खु., हनुमान मंदिराजवळ, ता.चाळीसगाव), रवींद्र नागो राजपूत (वय ५२, रा. नवेगाव मेहुणबारे, ता. चाळीसगाव) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून जप्त केलेला पाईप आणि वाहन अंदाजे २ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पळून गेलेल्या व्यक्तींबाबत माहिती घेता त्यांनी त्यांची नावे किरण म्हस्के आणि रोशन मोरे असे असल्याची माहिती प्राप्त झाल्यावर तात्काळ पोलीस पथक पळून गेलेल्या आरोपितांचा शोध घेण्यासाठी गेले होते. तेव्हा रोशन युवराज मोरे (वय २३, रा. दसेगाव, ता. चाळीसगाव) हा चाळीसगाव बसस्टँण्डजवळ मिळून आला. तेव्हा त्यास ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले. पळून गेलेला किरण म्हस्के याचा शोध घेऊन ताब्यात घेणार आहेत. जप्त मुद्देमाल नमूद आरोपितांनी कोठून चोरून आणला, याबाबत तपास चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पो.ना.दीपक पाटील, पो.शि.अमोल भोसले करीत आहे.