गटविकास अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची संघटनेची मागणी
साईमत/यावल/प्रतिनिधी
येथील पंचायत समिती समोर गेल्या दोन दिवसांपासून ‘निळे निशान संघटनेचे’ विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन सुरू होते. परंतु शुक्रवारी, ४ ऑक्टोबर २०२४ रोजी गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड व संबंधित अधिकारी यांच्याशी झालेली चर्चा निष्पळ ठरल्याने संघटनेने आजपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे आता यावल पंचायत समिती सहसंबंधित अधिकाऱ्यांची डोकेदुखी सुरू झाल्याने शेवटी काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण यावल, रावेर तालुक्याचे लक्ष लागून आहे. यावल तालुक्यातील अनु.जाती-जमातीच्या लोकांचा जाणीवपूर्वक मानसिक छळ करून त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करून अनु.जाती-जमातीच्या लोकांना न्याय मिळवून देण्याकरिता शनिवारी, ५ ऑक्टोबरपासून यावल पंचायत समिती कार्यालयासमोर‘निळे निशान संघटने’च्यावतीने संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष आनंद बाविस्कर यांचे आमरण उपोषणास प्रारंभ झाला.
यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांनी जाणीवपूर्वक तालुक्यातील काही गावाच्या अनु.जाती-जमातीच्या लोकांना जातीय द्वेष भावनेतून त्यांच्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवण्याचे काम गटविकास अधिकाऱ्यांने केले आहे. त्याच्या निषेधार्थ ‘निळे निशान संघटने’च्यावतीने ३ ऑक्टोबरपासून संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष यांच्या उपस्थितीत अनु. जाती-जमातीच्या शेकडो महिलांनी पंचायत समिती कार्यालयासमोर रात्रंदिवस ठिय्या आंदोलन सुरू केले. ४ऑक्टोबर रोजी यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी आंदोलनास्थळी भेट देऊन चर्चा करण्याचा प्रयत्न केला. परंतु संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष आनंद बाविस्कर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे अधिकारी निरुत्तर होऊन अधिकाऱ्यांनी उडवाउडवीचे उत्तर देऊन चर्चा संपुष्टात आणली. त्याअनुषंगाने अनुसुचित जाती-जमातीच्या जीवघेण्या समस्यांकडे शासन प्रशासनाचे लक्ष केंद्रित होईल.
तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार
अनुसुचित जाती-जमातीच्या लोकांचा जाणीवपूर्वक मानसिक छळ करणाऱ्या जातियवादी मानसिकतेच्या गटविकास अधिकारी व इतर संबंधित व्यक्तीवर शासन, प्रशासनाने शासकीय सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई करून अनुसुचित जाती-जमातीच्या लोकांना न्याय द्यावा, यासाठी ठिय्या आंदोलनांचे रूपांतर आता आमरण उपोषणात केले आहे. त्या अनुषगांने संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष आनंद बाविस्कर यांनी स्वतः आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला. तसेच लवकरच अनु.जाती-जमातीला न्याय न मिळाल्यास संघटनेच्या महिला आघाडीच्यावतीने लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती संघटनेचे यावल तालुकाध्यक्ष विलास तायडे, यावल तालुका महिला आघाडी अध्यक्षा मनिषा बागुल यांनी दिली.