साईमत, नवीदिल्ली ः वृत्तसंस्था
मणिपूर हिंसाचारावरून विरोधी पक्षाने सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरवर कोणतंही ठोस भाष्य न करता हसत हसत मणिपूरची चेष्टा केली. मणिपूरमध्ये लोक मरताहेत, महिलांवर अत्याचार होत आहेत आणि आपले पंतप्रधान संसदेत हसून भाषण करतात, भारताच्या पंतप्रधानांना हे वागणं शोभत नाही. खरंतर पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या पदाचं गांभीर्यच राहिलेलं नाही, अशा शब्दात काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी मोदी यांच्या लोकसभेतील भाषणाचा चांगलाच समाचार घेतला.
विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीने आणलेल्या ‘अविश्वास प्रस्तावा’ला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल २ तास १३ मिनिटांचं लांबलचक भाषण केलं. ज्या मुद्द्यांवरून विरोधकांनी अविश्वास ठराव आणला, त्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी अगदी चार-पाच मिनिटेच बोलले. मोदींच्या याच भाषणाचा समाचार राहुल गांधी यांनी राजधानी नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना मणिपूर जाळायचे आहे. त्यांना तिथली आग विझवायची नाही. त्यामुळेच मी मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या झाल्याचे म्हटले होते. मी हे विधान उथळपणे केलेलं नव्हते. मणिपूरमध्ये अनेक महिन्यांपासून आगीचा वणवा पेटला आहे. लोक मारले जात आहेत. महिलांवर बलात्कार होत आहेत. लहान मुलांना मारले जात आहे, आणि आपले पंतप्रधान संसदेत हसून भाषण करतात. गंभीर विषयावर बोलत असताना हसत हसत, विनोद करत, विरोधकांची खिल्ली उडवत भाषण करणं,भारताच्या पंतप्रधानांना हे वागणं शोभत नाही, अशा शब्दात राहुल गांधी यांनी मोदींवर सडकून टीका केली.
मी जवळपास १९ वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत प्रत्येक राज्यात गेलो आहे. १९ वर्षात मी मणिपूरमध्ये जे काही पाहिलं आणि ऐकलं ते याआधी कधीच पाहिले नाही. जेव्हा आम्ही मैतेई भागात गेलो तेव्हा आम्हाला सांगितले होते की आमच्या सुरक्षेसाठी कुकी वैयक्तिक आणू नका, अन्यथा आम्ही त्यांना मारून टाकू. जेव्हा आम्ही कुकी भागात गेलो तेव्हा आम्हाला सांगण्यात आले की मैतेईला आमच्या सुरक्षेसाठी आणू नका नाहीतर आम्ही त्याला गोळ्या घालू. आम्हाला दोन्ही ठिकाणी मैतेई आणि कुकी यांना व्ोगळं करावं लागलं. म्हणूनच मी म्हणालो की भारतमातेची हत्या झालीये, असे स्पष्टीकरण राहुल गांधी यांनी संसदेत केलेल्या विधानावर दिलं.
पंतप्रधानांचे भाषण देशाबद्दल नव्हे, स्वतःबद्दल होते
पंतप्रधानांचे भाषण भारताबद्दल नव्हते, ते नरेंद्र मोदींबद्दल होते. ते त्यांच्या राजकारणाबद्दल होते. पंतप्रधानांना स्वतःबद्दल सांगायचे आहे, ते २०२४ मध्ये पंतप्रधान होतील, ही नंतरची गोष्ट आहे. हे त्यांनी सभेत सांगाव्ो. पण संसदेत मणिपूरवर चर्चा होत होती. त्यावर ते काहीच बोलले नाही, असे राहुल गांधी म्हणाले. सरकार म्हणते की त्यांनी मणिपूरमधील यंत्रणा बदलून टाकली, मग मुख्यमंत्र्यांनी राजीनामा का देऊ नये? मणिपूरमध्ये जी हजारो शस्त्रे लुटली गेली ती सरकार असतानाच लुटली गेली. जी हिंसा सुरू आहे, तशी हिंसा सुरूच राहावी, अशी अमित शहांची इच्छा आहे. तिथे जे घडत आहे ते मुख्यमंत्री असतानाच घडत आहे, असेही गांधी म्हणाले.