मुक्ताईनगरला यात्रेतील मंगलपोतसह मोटार सायकल चोरटे ताब्यात

0
15

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी

येथील आदिशक्ती श्री संत मुक्ताईच्या यात्रोत्सवात महिलांच्या मंगलपोत आणि मोटरसायकली चोरणाऱ्या चोरट्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. दरम्यान, दोन्ही गुन्ह्यातील चोरट्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यात दोन महिलांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.

सविस्तर असे की, मुक्ताईनगर शहरात गेल्या ७ मार्च रोजी नवीन मुक्ताबाई मंदिर व मुक्ताबाई जुने मंदिर कोथळी येथे आदिशक्ती मुक्ताबाई यात्रोत्सव आणि महाशिवरात्रीनिमित्त भाविक भक्तांची दर्शनासाठी गर्दी जमणार होती. त्या गर्दीचा फायदा घेऊन भुरटे चोर हे महिलांच्या गळ्यातील मंगलपोत, पाकीट व मोबाईल चोरी तसेच मोटार सायकलींची चोरी करतात. अशा चोरीच्या घटना घडू नये, यासाठी चोरट्यांना प्रतिबंध व आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्‍वरी रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे यांनी मुक्ताई मंदिर कोथळी तसेच नवीन मंदिर येथे यात्रेनिमित्त मार्गदर्शन व सूचना देऊन योग्य बंदोबस्त नेमण्याबाबत आदेशित केल्याप्रमाणे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांनी वरिष्ठांनी दिलेल्या सूचना ह्या बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांना सतर्क पेट्रोलिंग व बंदोबस्त करण्याबाबत सूचना दिल्या होत्या.

त्याप्रमाणे कोथळीतील मंदिर येथे काही महिलांच्या गळ्यातील मंगलपोत चोरी झाल्याची घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नागेश मोहिते, पोलीस उपनिरीक्षक राहुल बोरकर, संदीप चेडे, पो.हे.कॉ. विकास नायसे, संदीप खंडारे, पो.ना. संदीप वानखेडे, पो.कॉ.रवि धनगर, प्रशांत चौधरी, राहुल बेहनवाल, महिला पो. कॉ. प्रज्ञा इंगळे, अश्‍विनी बोदडे यांनी यात्रेत संशयित चोरट्यांचा शोध घेत असतांना दोन संशयित महिला मिळून आल्याने त्यांची चौकशी केली होती. तेव्हा पूजा उर्फ मिना बाबुराव पवार (वय २०), उषा संजय काळे (वय २२, दोन्ही रा. भावसिंगपुरा, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) यांची महिला अंमलदाराकडून अंगझडती घेण्यात आली. तेव्हा त्यांच्याकडे ९६ हजार रुपये किमतीचे मंगळसुत्र, सोन्याच्या ११ नग वाटी (वजन अंदाजे १२ ग्रॅम वजनाचे), सोन्याचे लहान मोठे मणी १९ नग (अंदाजे ४ ग्रॅम वजनाचे काळ्या व पिवळ्या मण्यांची पोत) असा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दोन्ही महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे.

दोन मोटारसायकल चोरटे शिताफीने ताब्यात

मुक्ताईनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोटार सायकल चोरीच्या घटना घडल्याची माहिती मिळाल्यावरुन वरील स्टाफसोबत घेऊन मोटार सायकल चोरी करणाऱ्यांचा शोध घेतला असता तेव्हा हितेश मधुकर महाजन (वय २८, जुनेगाव आठवडे बाजार, मुक्ताईनगर, ता. मुक्ताईनगर) आणि राहुल रमेश महाजन (वय २५, रा. नामदेव नगर, गजानन महाराज मंदिराजवळ, मुक्ताईनगर, ता. मुक्ताईनगर) यांनी मुक्ताईनगर पो.स्टे.च्या हद्दीत मोटार सायकल चोरी केल्याचे समजुन आल्याने त्यांना शिताफीने ताब्यात घेऊन गुन्ह्यात अटक करुन त्यांच्याकडून मोटार सायकल जप्त केली आहे.

त्यात ३० हजार रुपये किमतीची एक काळ्या रंगाची सिल्व्हर पट्टी असलेली हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मॉडेलची मोटार सायकल (क्र. एमएच १९ सीएच ४४१७) पोलिसांनी हस्तगत केली आहे. दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. संदीप खंडारे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here