साईमत, पाळधी, प्रतिनिधी
येथील कासट ग्रुपच्या कार्यालयाची ग्रील तोडून कॅबिनमधून 2 लाख 60 हजारांची रक्कम रात्री चोरट्यांनी लांबवल्याची घटना रविवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे.
येथील प्रसिद्ध उद्योगपती कासट ग्रुपचे संचालक अशोक व शरद कासट यांचे महामार्गावर घर असून घराच्या आवारात त्यांचे व्यावसायिक कार्यालय आहे. तेथूनच त्यांचे सर्व व्यवहार होत असतात. ते वीटभट्टीच्या व्यवसायाबरोबरच ते सरकारी कंत्राटदार आहेत. त्यांच्या कार्यालयात जवळपास सहा कॅबिन आहेत. रविवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास कार्यालयातील खिडकीचे ग्रिल तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला व त्यांनी प्रत्येक कॅबेिनमध्ये जावून ड्रॉवरमधून पैसे काढले. यात शरद कासट यांचे 40 हजार, शैलेश कासट यांचे एक लाख, आशिष कासट यांचे 70 हजार, अमर कासट यांचे 50 हजार असे एकूण दोन लाख 60 हजारांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. या वेळी तेथे असलेल्या रखवालदाराला चाहूल लागली असता चोरट्यांनी त्याला दगड मारून फेकले. त्याने आरडा ओरड करताच घरातील सर्वजण जागे झाले. तोपर्यंत चोरट्यांनी पळ काढला होता. या वेळी चोरट्यांनी सोबत सीसीटीव्हीचा डीव्हीआर काढून नेला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. घटनास्थळी फिंगरप्रिंट पथक दाखल होऊन त्यांनी ठसे घेतले. अमळनेर भागाचे डीवायएसपी सुनील नंदवालकर, धरणगावचे पो.नि.उध्दव ढमाले, स.पो.नि.प्रमोद कठोरे आदींनी भेट घेतली. याबाबत अनिल कासट यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास उमेश भालेराव आदी करीत आहेत.