साईमत, धानोरा, ता. चोपडा : वार्ताहर
येथील यावल बसस्थानक परिसरातील सात दुकाने तर लक्ष्मी नगरातील एक बंद घर फोडले. याप्रसंगी धानोरा पोलीस पाटील यांनी पाहणी करुन अडावद पोलीस ठाण्यात सांगितले. परंतू पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून चोऱ्या झालेल्या ठिकाणी साधी पाहणी वा विचारपूस करण्याची तसदी घेतली नसल्याने संताप व्यक्त होत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अडावद पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.
सविस्तर असे की, यावल बसस्थानक परिसरातील अमरदीप गुजर यांचे सूर्यवंशी टी सेंटर, रावसाहेब पाटील यांचे सातपुडा कृषी केंद्र, राजेंद्र चौधरी यांचे कांचन प्रिंटर्स जनरल स्टोअर्स, अडावदकरांचे जनता फ्रुट कंपनी व सद्गुरू दूध उत्पादक सोसायटी व जुने एटीएम दुकान अशा सर्व दुकानांचे टॉमीने कुलुपे तोडून रोख रक्कम, चिल्लर व साहित्य चोरून नेले. लक्ष्मी नगरातील गोकुळ कुंभार हे गावाला गेले होते. त्यांच्या बंद घरात चोरी केली. मात्र, काय ऐवज गेला ते कळू शकले नाही. ही घटना शुक्रवार रात्री घडली. या वेळेत दररोज वीज मंडळाचा वीज पुरवठा बंद होता तर संततधार पाऊस सुरु होता. पहाटे प्रशांत अंबादास महाजन हा दूध काढण्यासाठी जात असतांना त्यांच्या लक्षात आल्यावर त्याने दुकानदारांना कळविले होते.