विहिरीवरील पंपाची चोरी ; शेतकरी हतबल
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील तळेगाव येथील शेतकऱ्यांसमोर एक मोठी समस्या उभी टाकली आहे. आता शेती तयार करून लागवडीचा काळ असताना विहिरीतील पंप चोरीला जात आहे. त्यामुळे आता लागवड करावी तर कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे. दरम्यान, जामनेर तालुक्यातील तळेगावसह परिसरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. विहिरीवरील पंप चोरीला जाऊ लागल्याने शेतकरी हैराण झाल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे.
जामनेर तालुक्यातील तळेगाव परिसरातील शेतकरी दिलीप बाबुराव घ्यार, जिजाबाई बुधा सुरवाडे यांच्या शेतातील एक सौर पंप व एक इलेक्ट्रिक पंप चोरांनी लांबवल्याने शेतकऱ्यांना आता नवीन पंप घेऊन कपाशी लागवड करावी लागेल. अडचणीत चोरांनी इलेक्ट्रिक पंप आणि सौर पंपावर डल्ला मारल्याने शेतकऱ्यांना आता दुसऱ्या समोर हात पसरण्याची वेळ आली आहे. याबाबत पोलीस यंत्रणेने तात्काळ शोध घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी आता परिसरातील शेतकरी करीत आहे.
चोरांना मिळतेय मोकाट रान
तळेगाव परिसरात छोट्या-मोठ्या चोऱ्या होत असतात. मात्र, गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ होत असल्याने ते रेकॉर्डला येत नाही. त्यामुळे चोरांना मोकाट रान मिळत आहे. त्यामुळे त्यांचे मनोबल वाढले आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून न्याय द्यावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांमधून जोर धरत आहे.
