चौरंगी लढत होईल पण सध्या दोघांचीच होतेय चर्चा

0
21
चौरंगी लढत होईल पण सध्या दोघांचीच होतेय चर्चा-www.saimatlive.com

साईमत जळगाव प्रतिनिधी (विवेक ठाकरे)

लोकसभेचा निकाल लागून अवघ्या दहा दिवसांचाच कालावधी लोटला अनं जिल्ह्यातील पाचोरा विधानसभा मतदारसंघात आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडायला सुरु झाल्या.हे द्वव यापूढे जात आ. किशोरआप्पा पाटील यांच्या एकेरी भाषेमुळे आणि भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे यांच्या प्रतिआव्हानाने चर्चेत असले तरी राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीत असलेल्या या दोघांची ही चढाओढ सद्यातरी नुराकुस्ती म्हटले तर वावगे ठरू नये.याउलट परिस्थिती असल्यास म्हणजे भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे मागील वेळेप्रमाणे बंडखोरी करू शकतात किंवा भाजपच्या वरिष्ठानी कदाचित त्यांना लढण्याचा हिरवा कंदील दिल्याच्या माहितीमुळे विद्यमान आमदारांची आदळआपट आतापासूनच सुरु झाली असावी. महत्वाचे फक्त श्रेयाच्या या लढाईत ऐन खरीपाच्या हंगामाच्या धामधूमीत शेतकऱ्यांचे महत्वाचे प्रश्न न सुटता तसेच बाजूला पडले असल्याने तालुक्यात सामान्य मतदारांमध्ये नाराजीचा सूर आहे.

पाचोरा विधानसभेची निवडणूक तिरंगी अथवा चौरंगी होण्याची शक्यता असतांना या आरोप प्रत्यारोपाच्या लढाईत दोघांचीच यानिमित्त चर्चा आहे.शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून आधीच जाहीर असलेल्या उमेदवार वैशालीताई पाटील यांनी मात्र भेटीगाठी-बैठका आणि थेट संपर्कातून मतदारसंघात आपली फिल्डिंग सुरु केली असतांना चौथे उमेदवार म्हणून ज्यांना गृहीत धरले जात आहे असे अजित पवार गटात असलेले माजी आ.दिलीप वाघ नेमके आहेत तरी कुठे ? असा प्रश्न यनिमित्ताने पुढे येत आहे.


शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा खरा वाली कोण ?

अनिष्ठ तफावतीत आलेल्या विकास सोसायट्यामधून शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा न होता त्यांना तालुकास्तरावर कर्जासाठी फेऱ्या माराव्या लागणार असल्याच्या संपूर्ण जिल्ह्याच्या या मुद्द्यावर फक्त पाचोऱ्यात रान माजले आहे. पाचोरा तालुका दुष्काळग्रस्त यादीत नसणे, नादुरुस्त हवामान केंद्रामुळे शेतकरी पीकविम्याच्या लाभापासून वंचित राहणे, मतदारसंघातील गावांचा पोकरा योजनेत सरसकट समावेश न होणे, कापूस बियाणे व रासायनिक खतांच्या कृत्रिम तुटवड्यावर आमदारांचे नियंत्रण नसणे या प्रश्नावर अमोलभाऊ शिंदे यांनी आ.किशोरआप्पा यांना टार्गेट केले असतांना आमदारांनी प्रश्नांना बगल तर दिलीच उलट अमोलभाऊ शिंदे यांचा पत्रकार परिषद घेत एकेरी उल्लेख करून पानउतारा केल्याने आमदार किशोरआप्पा खरंच वैफल्यग्रस्त झालेत का ? असे विचारले जात आहे. एकूणच अमोलभाऊ शिंदे यांचे आव्हान,आ.किशोरआप्पा यांनी त्यांचे आमदारकीचे स्वप्न मतदारसंघ पूर्ण होऊच देणार नाही असा केलेला दावा याबाबतचा निकाल येणाऱ्या काळात लागेल पण शेतकऱ्यांचे प्रश्न तुमच्या नुराकुस्तीत मागे पडले त्याचे काय ? सोबतच आ. किशोरआप्पा पाटील यांनी मैत्रेयच्या ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळवून देण्याचे आश्वासन हवेत विरल्याची चर्चा आता मतदारसंघात सुरु झाली आहे.


वैशालीताई यांची एकांगी लढाई झाली यशस्वी :

लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराचा किल्ला वैशालीताई सूर्यवंशी यांनी एकहाती लढवला नव्हे त्यात एका अर्थाने यशस्वी पण झाल्या. भाजपा महायुतीच्या उमेदवाराच्या बाजूने येथे शिंदे गटाचे आ.किशोरआप्पा पाटील,राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आ.दिलीप वाघ आणि भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोलभाऊ पाटील यांनी साखळी करून म्हणजे एकमेकांच्या सोबत न येता भाजपाच्या विजयाची मोहीम राबवली. गेल्या २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपाला असलेले ७० हजाराचे मताधिय हे सर्व एका बाजूला तर शिवसेना ऊबाठाच्या वैशालीताई दुसऱ्या बाजूला असतांना हे मताधिय यावेळी फक्त १६ हजारावर आले आहे.


अमोलभाऊ शिंदे यांनी भाजपाचा प्रचारच केला नसल्याचा आ. पाटील यांचा दावा स्थानिकांना पटत नसून शिंदे यांच्यासाठी लोकसभा म्हणजे आगामी विधानसभेची रंगीत तालीम असल्याने त्यांनी या संधीचा लाभ घेत मतदारसंघांचे गाव अन गावं पिंजून काढल्याची माहिती आता पुढे येऊ लागली आहे. एकूणच उलट या तिघांना प्रचारयंत्रणा आणि मताधिक्यात वैशालीताई यांनी रोखण्यात यश मिळवले असून त्यांची लोकसभेतील एकाकी झुंज आणि कोरी पाटी म्हणून असलेले व्यक्तीमत्व विधानसभेला कामी येईल, असा विश्वास आता मतदार देत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here