साईमत, वरणगाव : प्रतिनिधी
शहरातील मुख्य मार्गासह भुसावळ मार्गावर मोकाट गुरांचा ठिय्या असतो. त्यामुळे वाहन धारकांना त्रास सहन करावा लागत आहे. मोकाट श्वानही अचानक वाहनांसमोर येत असल्याने दुचाकी धारकांना किरकोळ अपघाताच्या घटनांना सामोरे लागत आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने ही समस्या मार्गी लावावी, अशी मागणी होत आहे.
शहरातील विविध भागात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.शहराच्या मुख्य मार्गावरील परिस्थिती तर फारच बिकट झाली आहे. यामध्ये महात्मा गांधी विद्यालय ते बसस्थानक चौक व रामपेठ चौफुलीपर्यंत रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यामुळे वाहन धारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच मुख्य मार्गावर मोकाट गुरांचा वावर तसेच रस्ता आपला असल्याच्या अविर्भावात त्यांचा ठिय्या बसत असल्याने तसेच बसस्थानक चौक, रेल्वेस्थानक मार्ग व गावाकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरही मोकाट गुरांची फिरस्ती वाढल्याने वाहन धारकांना मार्गक्रमण करतांना अडचणीचे ठरत आहे. इतकेच नव्हे तर मोकाट श्वानांचाही मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढला आहे. मोकाट श्वान दुचाकी व इतर वाहन धारकांच्या समोर अचानक येत असल्याने किरकोळ अपघाताच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. त्यामुळे त्रस्त होत असलेल्या वाहन धारकांकडून शहरातील मोकाट गुरे व श्वानांचा नगर परिषद प्रशासनाने त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
मोकाट गुरे कुणाच्या मालकीची…?
शहरातून भुसावळ आणि मुक्ताईनगरकडे जाणाऱ्या मार्गाच्या मधोमध मोकाट गुरांचा ठिय्या बसलेला दिसून येत असल्याने इतक्या मोठ्या प्रमाणात असलेली मोकाट गुरे कुणाच्या मालकीची ? असा प्रश्न निर्माण होत आहे. पशुधन मालकाचे आपल्या पशुधनावर मोठ्या प्रमाणात प्रेम असते. तसेच त्यांच्या देखभालीची काळजीही घेतली जाते. मात्र, आपल्या पशुधनाला मोकाट सोडण्यामागचे कारण काय? यासाठी नगर परिषद प्रशासनाने बेवारस असलेल्या मोकाट गुरांना ताब्यात घेऊन त्यांच्या मालकावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी होत आहे. तसेच मोकाट सोडलेली गुरे कत्तलीच्या इराद्याने आणून पोलिसांच्या कारवाईच्या भितीने आपआपल्या गोदामात न ठेवता मोकाट तर सोडण्यात आली नसावी, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.