सत्रासेन येथील शाळेत सात दिवसांचे ग्रामीण हिवाळी शिबीर यशस्वी
साईमत/चोपडा /प्रतिनिधी :
ध्येय निश्चितीशिवाय जीवनात यशाचा पर्याय नाही. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय लवकरात लवकर ठरवून त्याच्या पूर्ततेसाठी सातत्याने आणि कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे. जितके मोठे ध्येय ठेवाल, तितके यशही मोठे मिळते, असे प्रतिपादन चोपडा तालुक्याचे गटविकास अधिकारी नरेंद्र पाटील यांनी केले. भगिनी मंडळ चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालयाच्या ग्रामीण हिवाळी शिबिराच्या समारोपप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका वंदना सरदार पावरा उपस्थित होत्या.
चोपडा संचलित भगिनी मंडळ समाजकार्य महाविद्यालयातील प्रथम वर्ष समाजकार्य स्नातक व प्रथम वर्ष समाजकार्य पारंगत (एमएसडब्ल्यू) वर्गाचे ग्रामीण हिवाळी शिबीर सत्रासेन (ता. चोपडा) येथील धनाजी नाना प्राथमिक शाळा तसेच डी.आर.बी.माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेत उत्साहात पार पडले. भगिनी मंडळ शैक्षणिक संकुलाच्या सहसचिव अश्विनी गुजराथी, उपाध्यक्षा छाया गुजराथी, संध्या गुजराथी, सोनल गुजराथी, वैशाली सौंदाणकर, मुख्याध्यापक जगदीश महाजन, भालचंद्र पवार, प्रा.डॉ.अनंत देशमुख, शिबिर संयोजक प्रा.डॉ. राहुल निकम, प्रा.डॉ.मारोती गायकवाड, प्रा.डॉ.मोहिनी उपासनी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात शिबिर संयोजक प्रा. डॉ. राहुल निकम यांनी शिबिरादरम्यान सात दिवसांत शिबिरार्थींनी केलेल्या विविध उपक्रमांचा सविस्तर आढावा मांडला. सहसचिव अश्विनी गुजराथी यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. संध्या गुजराथी यांनी शिबिरार्थींच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करत महाविद्यालयीन जीवनाचे महत्त्व अधोरेखित केले. प्रा.डॉ. अनंत देशमुख यांनी विद्यार्थ्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त केले.प्रा.डॉ.मोहिनी उपासनी यांनी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी रांगोळी, मेहंदी आदी स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवल्याचे सांगत विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरव केला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांची बक्षिसे वितरित करण्यात आली.
शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांनी ग्रामीण सहभागीय मूल्यांकन (पी.आर.ए.) अंतर्गत शिवार फेरी, गावाचा इतिहास, सत्रासेन गावातील विविध कल्याणकारी संस्था, उपलब्ध संसाधने तसेच गावाची माहिती नकाशांच्या माध्यमातून सादर केली. विद्यार्थ्यांच्या या अभ्यासपूर्ण कार्याचे मान्यवरांनी विशेष कौतुक केले.राज पाटील, क्रांती बैसाणे, पूजा साळुंखे, ज्ञानेश्वर पाटील, महेंद्र साळुंखे, उज्वला देवरे, आशिक पावरा आदी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत या शिबिरातून ग्रामीण जीवन, सामाजिक समस्या व समाजकार्याची प्रत्यक्ष अनुभूती मिळाल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप निकम यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ.मारोती गायकवाड यांनी केले. यशस्वी शिबिराबद्दल समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदाणकर, उपप्राचार्य प्रा.डॉ.आशिष गुजराथी, आश्रम शाळेचे सचिव ज्ञानेश्वर भादले, भगिनी मंडळ शैक्षणिक संकुलाच्या अध्यक्षा पूनम गुजराथी तसेच उद्योगपती आशिष गुजराथी यांनी समाधान व्यक्त केले.
