साईमत, जळगाव : प्रतिनिधी
येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांचे छत्रपती संभाजी नगर उच्च न्यायालयात फिर्याद रद्द करण्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही त्यांनी जळगाव सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे बकालेंच्या अटकपूर्व जामिनावर सरकार पक्षातर्फे २५ ऑक्टोबर रोजी खुलासा सादर करण्यात आला. न्यायालयाने याबाबत पुढील कामकाजासाठी आता ३१ ऑक्टोबर ही तारीख दिली आहे. जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
निलंबित पोलीस किरण बकाले यांचे उच्च न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही तसेच न्यायालयाने चौकशी अधिकाऱ्यांसमोर हजर व्हा म्हणून सांगितल्यावरही ते हजर राहत नाहीत. उच्च न्यायालयाने आधीच बकाले यांचा अटकपूर्व नाकारला असताना आता त्यांना अटकपूर्व जामीन कसा देता येईल ? असा युक्तीवाद मुद्दा हरकत दार पक्षातर्फे बुधवारी २५ ऑक्टोबर रोजी सादर झाला. तसेच, उच्च न्यायालयात त्यांच्याविरुद्धची फिर्याद रद्द व्हावी या अर्जावर ३० ऑक्टोबर रोजी कामकाज असताना त्यांनी जळगाव न्यायालयात नवीन अर्ज कसा दाखल केला तसेच सरकार पक्षाकडून आरोपी बकाले याचे आवाजाचे नमुने घेणे आवश्यक आहे व तो पुरावा नष्ट करण्याची शक्यता आहे असे लेखी म्हणणे सादर करून अटकपूर्व जामीन रद्द करणेची विनंती केली आहे. हरकतदारतर्फे वकिलांनी देखील तसें सांगितले. न्या. बी. एस. वावरे यांनी याप्रकरणी पुढील कामकाज हे ३१ ऑक्टोबर रोजी ठेवले आहे.
मराठा समाज जामिनाला विरोध करणार
दरम्यान, सकल मराठा समाजाच्यावतीने केस लढणारे ॲड.गोपाळराव जळमकर,ॲड कुणाल पवार ,महिला फिर्यादी सुचिता पाटील, वंदना पाटील, रामदादा पवार, संतोष पाटील, हिरामण चव्हाण, धिरज पाटील व असंख्य मराठा समाजबांधव यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या पार्श्वभूमीवर मराठाव्देषी निलंबित पीआय बकाले यास जामिन मिळूच नये यासाठी सकल मराठा समाजाचे सर्व बंधुभगिनींनी ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा व सत्र न्यायालय मेनगेटजवळ प्रचंड संख्येने उपस्थित रहावे, ही आग्रहाची विनंती आहे.