अवकाळी पावसाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना दिलासा
साईमत/धरणगाव/प्रतिनिधी –
जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रशासनाने तात्काळ हालचाली सुरू केल्या आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे तत्काळ पूर्ण करून शासनाच्या नियमांनुसार मदत दिली जाईल, असे स्पष्ट निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या अडचणींमध्ये शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, प्रत्येक पात्र शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी धरणगाव तालुक्यातील बोरगाव बुद्रुक, गारखेडा, पष्टाने बुद्रुक तसेच जळगाव तालुक्यातील करंज, धानोरा आणि धार्डी या गावांतील नुकसानग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान अनेक ठिकाणी उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याचे दिसून आले. पालकमंत्र्यांनी थेट शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधला व पिकांच्या नुकसानीसह त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
पाहणीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देताना पालकमंत्री पाटील म्हणाले की, ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे त्यांनी तात्काळ तलाठी कार्यालयात आपली नावे नोंदवावीत. त्यानंतर पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी ग्रामपंचायत कार्यालयात प्रसिद्ध करण्यात यावी, जेणेकरून मदतीची प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पार पडेल. कोणताही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, असेही त्यांनी बजावले.
अवकाळी पावसामुळे काही भागांत वीजेचे खांब कोसळून वीजपुरवठा खंडित झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना तुटलेल्या वीज तारा व खांबांची तात्काळ दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश देण्यात आले. शेतकऱ्यांच्या शेतीकामांवर परिणाम होऊ नये, यासाठी वीजपुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
या वेळी शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई, पंचनाम्यांची गती, वीजपुरवठा आणि शेतीसंबंधित अन्य समस्यांबाबत आपली मते व निवेदने पालकमंत्र्यांसमोर मांडली. त्यावर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून कोणालाही अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी ठाम ग्वाही दिली. प्रशासन संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून असून प्रत्येक पात्र शेतकऱ्याला नियमानुसार मदत मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या पाहणी दौऱ्यावेळी अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर, जिल्हा कृषी अधिकारी कुर्बान तडवी, गटविकास अधिकारी किशोर वानखेडे, तहसीलदार शीतल राजपूत, नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते, मंडळ अधिकारी आशिष वाघ व ज्योती चौधरी, तालुका कृषी अधिकारी के. एच. देसले, तलाठी जीवनकुमार खोकले, ज्योती लोखंडे यांच्यासह संबंधित गावांचे सरपंच, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
