साईमत, बोदवड : प्रतिनिधी
येथील रहिवासी तथा साळशिंगी येथील शेतमालक संदीप मधुकर वैष्णव गट क्रमांक ३२० यांनी आपल्या शेतात गुरांचा गोठा बांधलेला आहे. या गुरांच्या गोठ्यात कापूस साठवून ठेवलेला आहे. मंगळवारी, १६ जानेवारी रोजीच्या मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी गोठ्याच्या गेटला असलेले कुलूप व खोलीच्या दरवाजाचे कुलूप टॉमीसारखे अशा शस्त्राने तोडून गोठ्यात साठविलेला सुमारे पाच क्विंटल कापूस बैलगाडीवर सोडून गेला आहे. कापूस चोरीमुळे संदीप वैष्णव यांचे ३५ हजारांचे नुकसान झाले आहे.
सद्यस्थितीला दुष्काळाची परिस्थिती आहे. यंदा कापसाला भाव नसल्याने शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवलेला आहे. त्यामध्ये अशा मोठ्या चोऱ्यांची संख्या वाढल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. अशा भुरट्या चोरांचा पोलिसांनी ताबडतोब बंदोबस्त करावा, गस्त वाढवावी, अशी मागणी तालुक्यातील सर्व शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे. कारण अशा कापूस चोरीच्या घटना प्रत्येक शेतकऱ्यासोबत घडत आहेत. अशा चोरट्यांना पोलिसांनी त्वरित पकडून त्यांना योग्य ती शिक्षा देण्याची मागणी होत आहे. याप्रकरणी संदीप वैष्णव बोदवड यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सचिन चौधरी करत आहेत.