साईमत, धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील एकलग्न येथील श्रीराम ऑटोमोबाईल पेट्रोलपंप येथे चारचाकीमधून आलेल्या अज्ञात तीन जणांनी उभ्या दोन टँकरमधून ४० हजार रूपये किंमतीचे ४४० लिटर डिझेल चोरून नेल्याची घटना शनिवारी, ७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी रविवारी, ९ ऑक्टोबर रोजी अज्ञात चोरट्यांविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर असे की, गणेश श्रीराम पाटील (वय ६४, रा. गणपती नगर, जळगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. त्यांचे धरणगाव तालुक्यातील एकलग्न येथे श्रीराम ऑटोमोबाईल नावाचे पेट्रोलपंप आहे. ७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात तीन जण एका कारमध्ये आले. त्यांनी पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या दोन ट्रॅक्टरमधून ४० हजार रूपये किंमतीचे ४४० लीटर डिझेलची चोरी केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पेट्रोलपंपाचे मालक श्रीराम पाटील यांनी धरणगाव पोलिसात धाव घेवून अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रविवारी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास पो.हे.कॉ. विजय चौधरी करीत आहे.