५७ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला
साईमत/ जळगाव /प्रतिनिधी
काशिनाथ चौफुली परिसरातील ओला इलेक्ट्रिक सर्व्हिस सेंटर समोर ५७ हजार रुपयांच्या बॅटरी व सुटे भागांची चोरी केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी आरोपी अफझल अली शब्बीर नगरी (वय २८, रा. शिवाजी नगर, जळगाव) आणि त्याचा एक साथीदार यांना अटक केली असून, चोरी गेलेला सारा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ओला इलेक्ट्रिकच्या ३ KV क्षमतेच्या बॅटरीची किंमत ४४ हजार रुपये आणि MCU असेंब्लीची किंमत १३ हजार रुपये असून, या दोन्ही वस्तू संध्याकाळी ७ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ९.३० च्या दरम्यान चोरील्या गेल्या होत्या. या चोरीची फिर्याद ओला ई-मॅनेजर निलेश संतोष कोळी (वय ३०, रा. जळगाव) यांनी दिली होती.
एमआयडीसी पोलिसांनी तातडीने तपास सुरु करून, ग्रेड उपनिरीक्षक संजय पाटील आणि त्यांच्या पथकाच्या प्रयत्नांनी आरोपींचा शोध लावला आणि दि. २० रोजी रात्री त्यांना अटक केली. पोलीस हेड कॉन्स्टेबल गिरीश पाटील पुढील तपास करीत आहेत आणि अटक केलेल्या आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येऊ शकतात असे पोलिसांनी सांगितले आहे.
या कारवाईमुळे परिसरात मोठा खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या वेगवान आणि प्रभावी कारवाईचे कौतुक केले आहे.
