कोठलीत बंदुकीचा धाक दाखवून चोरी

0
23

साईमत, शहादा: प्रतिनिधी
कोठली (ता. शहादा) येथील मनीषा राजेंद्र पाटील यांच्या राहत्या घरात तीन चोरट्यांनी घराच्या मागील दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रव्ोश करत सुमारे 75 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना बुधवारी (ता. 24) रात्री अडीच ते तीनच्या दरम्यान घडली.
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, वारंवार होणाऱ्या चोरीच्या तसेच दरोड्याच्या घटनांमुळे सारंगखेडा पोलिसांपुढे दरोडेखोरांनी मोठे आव्हान उभे केले आहे. कोठली त.सा. येथील घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मनीषा राजेंद्र पाटील (वय 47) घरात एकट्या असताना बुधवारी रात्री अडीच ते तीनच्या दरम्यान चोरटे घराच्या मागील दरवाजाच्या कडीकोयंडा तोडून आत घुसून 60 हजार रुपये किमतीचे दहा ग्रॅमचे सोन्याचे दागिने नेले. त्यात तीन ग्रॅमचे कानातील दागिने, दोन ग्रॅमच्या लहान मुलांचे कानातील बाळ्या, दोन ग्रॅमचे ओम पान व साडेतीन ग्रॅमचे स्त्रियांचे कानातील दागिने तसेच पंधरा हजार रुपयांची रोकड असा 75 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी नेला.

आत प्रव्ोश केल्यानंतर चोरट्यांनी महिलेसमोर स्प्रेचा वापर करून तिला बेशुद्ध केले त्याचबरोबर तिघांकडे गावठी कट्टा अर्थात बंदुका असल्याचे समजते. तिन्ही चोरट्यांमधून दोघांनी काळ्या रंगाचा टी-शर्ट व एकाने पांढऱ्या रंगाचा हाफ बाह्यांचा शर्ट घातलेला होता. त्याचबरोबर ते हिंदी भाषेत संभाषण करत होतेे.यानंतर त्यांनी मनीषा पाटील यांच्या घरातून आपला मोर्चा दुसऱ्या दोन घरांकडे वळवत तेथेदेखील त्यांनी घरातील सामान अस्ताव्यस्त करून त्या ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला, मात्र दोन्ही घरांमध्ये काहीही मिळून न आल्याने तिथून त्यांनी पळ काढला.नाटू साहेबराव पाटील यांच्या नवीन घराचे काम सुरू असल्याने ते त्या ठिकाणी झोपायला गेले होते, तसेच सुनील संतोष पाटील सुरत येथे गेले होते मात्र या दोन्ही घरात चोरट्यांना काही हाती लागले नाही.रात्री दोनपासून ते पहाटे पाचपर्यंत मनीषा पाटील यांच्या घरात चोरट्यानी धुमाकूळ घातला. महिलेला दमदाटी करत घरात अजून काय आहे ते काढून दे अन्यथा तुला मारून टाकू, अशी धमकी देत चोरट्यांनी बंदुका व जिवंत काडतुसे दाखवत धमकावले. ते हिंदी भाषेत संभाषण करत असल्याचे मनीषा पाटील यांनी सांगितले. सारंगखेडा पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पोलिस निरीक्षक कैलास वाघ तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here