साईमत/ न्यूज नेटवर्क । जळगाव ।
नेहमीच्या मारहाणीला कंटाळून तरुणाने स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना २५ रोजी दुपारच्या सुमारास अमळनेर तालुक्यातील शिरुड येथे घडली. आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर जोपर्यंत गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक होत नाही, तोपर्यंत प्रेत तहसील आवारातून हलविणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. अखेर चौघांवर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक केली आहे. त्यानंतर तब्बल तीन तासानंतर प्रेत तहसील आवारातून हलविण्यात आले.
विलास भाईदास घिसाडी (वय ३५) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो कुटुंबांसमवेत शिरुड गावी वास्तव्यास होता. त्याच्या घराच्या मागील बाजूस रामबाई भुरा वडर, विनोद भुरा वडर, प्रवीण भुरा वडर, सुदाम भुरा वडर हे राहतात. त्यांचे डुक्कर नेहमी मोकाट सोडल्यामुळे विलास घिसाडी यांच्या घरात येऊन अन्नधान्याचे नुकसान नेहमी करीत होते. त्यांना विलास घिसाडी आणि त्यांचा भाऊ गणेश घिसाडी हे नेहमी समजावून सांगत होते की, तुमच्या डुकरांमुळे आमचे नुकसान होते, असे सांगितल्याचा राग येऊन दोघे भावांशी नेहमी वाद करत होते. शिवाय विलास यास बऱ्याच वेळेस किरकोळ मारहाण केली आहे. त्याच कारणावरुन रामबाई भुरा वडर, विनोद भुरा वडर, प्रवीण भुरा वडर आणि सुदाम भुरा वडर यांनी विलास घिसाडी यास लाठ्या काठ्यांनी मारहाण केली. अखेर मारहाण आणि मानसिक त्रासाला कंटाळून विलासने स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेतले. त्याला नातेवाईकांनी तात्काळ धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले होते. मात्र, त्याच्यावर उपचार सुरु असताना २६ रोजी पहाटेच्या सुमारास विलासचे निधन झाले.
प्रांताधिकाऱ्यांसह पोलीस निरीक्षकांना घातला घेराव
विलासचे निधन झाल्याचे समजताच नातेवाईकांनी धुळे येथे धाव घेत प्रेत अमळनेर तहसील कार्यालयाच्या आवारात दुपारच्या सुमारास आणले. प्रांताधिकारी आणि पोलीस निरीक्षकांना घेराव घातला. यावेळी प्रांताधिकारी महादेव खेडकर आणि पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी नातेवाईकांची समजूत काढून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. अखेर चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. यापैकी विनोद, प्रवीण व सुदाम वडर यांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे करत आहेत.