जळगावातील बौद्ध वधू-वर परिचय मेळाव्यात प्रतिपादन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
योग्य जोडीदाराची निवड करताना व्यक्तीने कुटुंब, समाज आणि देशहिताचा विचार करावा. गौतम बुद्धांचे विचार आपल्या दैनंदिन जीवनात अनुसरावेत. तरुण-तरुणींना आपले संसारिक जीवन सांभाळतानाच सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ राजेश झाल्टे यांनी केले. ते बौद्ध वधू-वर परिचय मेळाव्याच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना बोलत होते.
सुरुवातीला सुभाष सपकाळे, मुकेश जाधव यांनी बुद्ध वंदना आणि त्रिशरण पंचशीलाने केली. मेळाव्यास राज्यभरातून बौद्ध वधू-वर उपस्थित होते. मेळाव्याचे उद्घाटन उद्योजक संजय इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून जयसिंग वाघ, डॉ. मिलिंद बागुल, ॲड.पंकज मेढे, दिलीप सपकाळे, रवींद्र इंगळे, भारती रंधे, मनीषा सुरवाडे, उमेश शिरसाठ, चंदा सुरवाडे आदी उपस्थित होते.
संसारिक जीवनात प्रवेश करण्यापूर्वी तरुण-तरुणींनी शैक्षणिक प्रगती, विचारांची परिपक्वता आणि सामाजिक बांधिलकी जोपासून कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मनोधैर्य मजबूत करावे, असे महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी सांगितले. यशस्वीतेसाठी दीपक बनसोडे, सुभाष सपकाळे, मुकेश जाधव, प्रशांत सोनवणे, मनीष साबळे, मिलिंद साबळे, मुन्ना भालेराव आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक चंद्रकांत सुरवाडे, सूत्रसंचलन बापूराव पानपाटील तर आभार श्रावण निकम यांनी मानले.