डॉक्टर्ससह कर्मचाऱ्यांची अपार शुश्रूषा, दानशूर कार्यकर्त्यांकडून परतीची व्यवस्था
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
रेल्वेतून पडून गंभीर जखमी झालेल्या एका तरुणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जीएमसी) तसेच समाजसेवकांच्या मदतीने चार महिन्यांची ‘शुश्रूषा’ (सेवा) करून सुखरूप घरी पाठवण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका, कर्मचारी यांनी कुटुंबातील सदस्याप्रमाणे दिलेल्या सेवेमुळे रुग्णाने कृतज्ञता व्यक्त केली.
उत्तरप्रदेश राज्यातील कानपूर येथील राजेश भगवान हे गावी जात असताना रेल्वेतून पडून गंभीर जखमी झाले होते. त्यांची सुरुवातीला ओळख पटत नसताना जळगाव येथे जीएमसीत दाखल केले होते. प्रथम अतिदक्षता विभागात आणि त्यानंतर जनरल वॉर्डमध्ये गेल्या चार महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. यादरम्यान नातेवाईकांना संपर्क साधूनही त्यांनी येण्यास नकार दिल्याने जीएमसीच्या डॉक्टर्ससह कर्मचाऱ्यांनी त्यांची शुश्रूषा केली. अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, अधीक्षक डॉ. धर्मेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी, १८ रोजी राजेश भगवान यांना त्यांच्या मूळ गावी निरोप देण्यात आला. यावेळी उप अधीक्षक डॉ. इम्रान पठाण, समाजसेवा अधीक्षक अनिल ठाकरे, दीपाली जाधव, ऐश्वर्या त्रिभुवन यांच्यासह कर्मचारी शकील पठाण उपस्थित होते.
अधिष्ठातांकडून सर्वांचे कौतुक
विशेष म्हणजे, रुग्णाच्या परतीच्या प्रवासासाठी दानशूर सामाजिक कार्यकर्ते इसाक बागवान यांनी रेल्वे तिकिट तसेच जळगाव-भुसावळ रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. याबद्दल जीएमसीचे अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांनी रुग्णाची काळजी घेणाऱ्या डॉक्टर्स, परिचारिका, कर्मचाऱ्यांसह सहकार्य करणाऱ्या समाजसेवकांचे कौतुक केले.
