डंपरखाली आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

0
13

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

पत्नीची प्रकृती बिघडल्यामुळे जामनेरातील रूग्णालयात तपासणी करून घरी निघालेल्या तरूणाचा डंपरच्या खाली आल्याने मृत्यू झाला तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी अरविंद मोरे, शैलेंद्र चव्हाण यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर रुग्णवाहिकेचे चालक दादु पाटील यांच्या मदतीने मयत संदीपचा मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केला होता. दरम्यान, पोलिसांनी डंपर ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशनमध्ये अपघाताचा गुन्हा नोंदविला आहे.

सविस्तर असे की, चाळीसगाव तालुक्यातील खडकी येथे संदीप राजेंद्र सूर्यवंशी (मराठे, वय ३३) हा तरुण आई आणि पत्नीसह वास्तव्यास आहे. शुक्रवारी, ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास संदीप हा गायत्रीसोबत खडकी येथुन मोटरसायकल क्र. एम. एच. १९ डी. क्यु. १८५९ ने जामनेर येथे रुग्णालयात जाण्यासाठी निघाला. जामनेर येथील रुग्णालयातील काम आटोपून पाचोऱ्याच्या दिशेने येत असतांनाच पाचोरा तालुक्यातील सांगवी गावाजवळील बस स्थानकाजवळ संदीपची मोटरसायकल गतिरोधकवर आदळली. त्यामुळे मोटरसायकलचे नियंत्रण सुटल्याने मोटरसायकल घसरली. यावेळी पत्नी गायत्री ही रस्त्याच्या बाजुला पडली. मात्र, संदीप हा रस्त्यावर पडला. त्याचवेळी कुऱ्हाडच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या डंपरच्या (क्र.एम. एच. ४६ एफ. ७८२४) मागील चाकाखाली आल्याने संदीपचा जागीच मृत्यू झाला. तपास पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल अरविंद मोरे, शैलेंद्र चव्हाण करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here