साईमत प्रतिनिधी
आशिया चषक २०२५ अंतर्गत दुबई येथे होत असलेल्या भारत-पाकिस्तान सामन्यावर देशभरातून प्रतिक्रिया उमटत असताना, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनीही आपलं स्पष्ट मत नोंदवलं आहे. “खेळू नये. माझ्या लोकांचं रक्त सांडलं आहे, मग आपण त्यांच्याशी का खेळावं?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
पुण्यात नाम फाऊंडेशनच्या दशकपूर्ती सोहळ्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी भारत-पाक सामन्यावरील वादाबाबत विचारणा केली. यावर नाना म्हणाले, “फक्त बोलून काही होत नाही. मत व्यक्त करून प्रश्न सुटत नाही. शेवटी सरकारचं धोरण आणि नियम यावरच निर्णय ठरतो.” त्यांच्या या विधानाने समाजमनातील नाराजी अधिक अधोरेखित झाली.
२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा बळी गेला होता. पुण्याचे संतोष जगदाळे यांचाही यात समावेश होता. त्यांच्या मुली आसावरी जगदाळे यांनी सामना होण्याला तीव्र विरोध दर्शवत म्हटलं, “दुबईत सामना ठेवून तुम्ही अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला निधी पुरवत आहात. जर खरी सहानुभूती असेल तर भारताने पाकिस्तानसोबत पुन्हा कधीही खेळू नये.”
दरम्यान, शिवसेना (ठाकरे) गटाने “माझे कुंकू, माझा देश” हे आंदोलन राज्यभर छेडले आहे. खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर थेट टीका केली. “अजित पवारांच्या अंगात पाकड्यांचं रक्त आहे. सामना पाहण्याची भाषा राष्ट्रभक्तांची नाही. पहलगाममध्ये मरण पावलेल्यांमध्ये तुमच्या घरचा एखादा असता, तर तुम्ही हे बोलला नसतात,” अशी टीका त्यांनी केली.
समाजमनातील जखमा अजून ताज्याच
भारत-पाक क्रिकेट सामन्याबद्दलचा वाद केवळ खेळापुरता मर्यादित न राहता भावनिक व राजकीय रंग घेत आहे. शहीदांच्या कुटुंबीयांचा आक्रोश, समाजातील अस्वस्थता आणि नाना पाटेकरांसारख्या प्रतिष्ठित व्यक्तींची ठाम भूमिका यामुळे या सामन्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
क्रिकेट हा खेळ असला तरी शहीदांच्या बलिदानाच्या पार्श्वभूमीवर तो राष्ट्रीय अस्मितेशी जोडला जातो. नाना पाटेकर यांचे विधान हे केवळ एका अभिनेत्याचे मत नसून समाजातील वेदना व असंतोषाचे प्रतिबिंब आहे. आता सरकार, क्रीडा संघटना आणि जनता यांच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहतो — देशाची प्रतिष्ठा महत्त्वाची की खेळाचा उत्साह?
            


