जळगावात विश्‍वातील पहिले श्री शिवचरित्र साहित्य संमेलन होणार

0
77

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे २०२४ हे वर्ष सार्थ त्रिशती वर्ष आहे. त्याच प्रसंगाचे औचित्य साधून २६ जून ते २९ जून २०२४ दरम्यान जळगाव येथे नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणावर विश्‍वातील पहिले श्री शिवचरित्र साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. शिवचरित्र सकारात्मक रीतीने पुढील पिढीस हस्तांतरित करावे, या उद्देशाने इतिहास प्रबोधन संस्था आणि नूतन मराठा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने संमेलनाचे आयोजन केले असल्याची माहिती संमेलनाचे निमंत्रक प्राचार्य लक्ष्मणराव देशमुख, संमेलनाचे नियंत्रक रवींद्र पाटील, पाचोरा इतिहास प्रबोधन संस्थेच्या सचिव भारती साठे, यावल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संमेलनानिमित्त शिवरायांच्या स्वराज्य विषयीचा दृष्टीकोन म्हणजे बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार म्हणजेच मराठा, मावळा हा संमेलनास सामील व्हावा, हा उद्देश आहे. जळगावात होणाऱ्या विश्‍वस्तरीय साहित्य संमेलनाचे उद्घाटक सातारा गादीचे छत्रपती श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले असणार आहेत. अध्यक्षस्थानी ‘शककर्ते शिवराय’ ग्रंथाचे लेखक विजयराव देशमुख, नागपूर असतील. संमेलनास कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज, तंजावरच्या गादीचे वारस श्रीमंत शिवाजी राजे भोसले, नागपूर गादीचे वारस श्रीमंत मुधोजी राजे भोसले उपस्थित राहतील.

विविध प्रदर्शनांचे सादरीकरण

शिवकाळातील छत्रपती शिवरायांच्या सोबत असणारे ७५ सरदार घराण्यांचे वारसदार येणार आहेत. जसे सुभेदार तानाजी बाबा मालुसरे, येसाजी कंक, बाजीप्रभु देशपांडे, मुरारबाजी देशपांडे यांचे वंशज संमेलनात दाखल होणार आहे. विश्‍वातील सर्वात मोठे नाणे संग्राहक किशोर चंडक सोलापूर, तुळजाभवानी शस्त्र प्रशिक्षण संस्था पुणे यांचे शस्त्रप्रदर्शन, तीनशे मराठ्यांच्या समाधीचे चित्ररुपी प्रदर्शन घेऊन इतिहासाचे अभ्यासक प्रवीण भोसले सांगली येथून येणार आहेत. तसेच संकेत गांगुर्डे यांचे पगडी प्रदर्शन आणि संतोष आवटी, जालना यांचे चित्रप्रदर्शन आणि सतीश दुधाने यांचे वीरगळ प्रदर्शन तसेच महेश पवार यांचे आरमार प्रदर्शन सादर होणार आहे.

पोवाडा गायनासह परिसंवादाचा समावेश

संमेलनात २६ जून रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर गोंधळ कार्यक्रम सादर करणारे राजाराम बापू कदम समूह, परभणी यांचा गोंधळ जागरण कार्यक्रम होणार आहे. २७ ला शिवरायावरील पहिला पोवाडा लिहिणारे शाहीर अज्ञानदास यांचे वंशज हरिदास शिंदे अहिल्यादेवी नगर हे लोप पावत चाललेल्या शिवकाळातील कला हा कार्यक्रम सादर करणार आहेत. २८ जून रोजी शाहीर प्रसाद विभुते, सांगली यांचा पोवाडा गायन कार्यक्रम सादर होणार आहे. संमेलनास ‘शिवपूर्वकालातील संत साहित्य आणि शिवोत्तर काळातील संत साहित्य’ विषयावर परिसंवाद होणार आहे. तसेच ‘शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाची गरज त्याची उपलब्ध होईल’ विषयावर एक परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहे.

संमेलनात सात प्रस्ताव पारित करणार

‘शिवछत्रपतींचे चरित्र ही काळाची गरज’ विषयावर एक प्रकट मुलाखत तसेच मराठ्यांची धारातिर्थे हा प्रश्‍नोत्तराचा कार्यक्रम होणार आहे. संमेलनामध्ये श्रीशिवछत्रपतींचे चरित्र शक्ती आणि भक्ती, शिवछत्रपतींची पत्रे, श्रीशिवछत्रपतींना अवगत असलेले नकाशा तंत्र, भारतीय ज्ञान परंपरा आणि श्री शिवछत्रपती, छत्रपतींचे मुलकी व्यवस्थापन, छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यापारी धोरण, शाहू फुले आंबेडकर यांच्या दृष्टिक्षेपातील छत्रपती शिवराय या आणि अशा अनेक विषयांवर भारतातले अनेक मान्यवर अभ्यासक आपले मत व्यक्त करणार आहेत. संमेलनाच्या माध्यमातून काही प्रस्ताव पारित करण्यात येतील. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा वास्तववादी इतिहास वर्तमान समाजाला योग्य पद्धतीने हस्तांतरीत करावा. या अपेक्षेने शासनाने कारवाई करावी. तसेच शिवकालीन अभ्यासासाठी उपयुक्त असणाऱ्या भाषा संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाने विशेष प्रयत्न करावे, असे विविध सात प्रस्ताव संमेलनाच्या माध्यमातून समाज क्षेत्राच्या पटलावर मांडल्या जाणार आहेत.

लेखांचे संकलन करुन ग्रंथरुपात प्रकाशन

इतिहास प्रबोधन संस्था, महाराष्ट्र आणि नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच वनसंपदा बहुउद्देशीय संस्था धरणगाव, राधेश्‍याम एज्युसोशल फाउंडेशन छत्रपती संभाजी नगर, गड संवर्धन प्रतिष्ठान पुणे, कनिष्ठ महाविद्यालयीन इतिहास परिषद महाराष्ट्र आणि श्री दादासाहेब केशवराव भोईटे इतिहास संशोधन मंडळ, जळगाव यांच्या सहकार्याने संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. यानिमित्त एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे शोधनिबंधाचे एक उच्चस्तरीय ग्रंथ निर्मिती करीत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्य, विचार याबाबतीत असणाऱ्या महत्त्वाच्या २९ विषयावर संदर्भ ग्रंथरूपामध्ये वेगवेगळे संशोधक, प्राध्यापक, प्राचार्य यांच्याकडून आलेले लेख संकलन करून त्याचे ग्रंथरूपामध्ये प्रकाशन करणार आहे. त्याचा उपयोग निश्‍चितच पुढील पिढीला अभ्यास आणि संशोधनाकरीता होणार आहे.

पुस्तक विक्रेत्यांसह प्रकाशकांचा सहभाग

संमेलनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर वेगवेगळ्या प्रकाशकांनी प्रकाशन केलेल्या ग्रंथांचे चार दिवसांमध्ये शिवचरित्र साहित्य संमेलनाच्या कालावधीमध्ये सहभागी होणाऱ्या प्राचार्य, प्राध्यापक, संशोधक तसेच वाचक यांना शिवसाहित्याचा उपयोग होणार आहे. याकरिता साहित्य संमेलनात ग्रंथदालन उपलब्ध करून दिले आहे. यामध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील पुस्तक विक्रेते, प्रकाशक सहभाग घेणार आहेत. जास्तीत जास्त संख्येने संमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here