पाडळसरे धरणाचे काम लवकरच पूर्ण करणार

0
23

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

पाडळसरे धरण मीच पूर्ण करणार आणि त्याचे कामही लवकरच पूर्ण होईल, अशी प्रत्यक्ष कामाची माहिती देऊन काम पूर्ण करणार असल्याची ग्वाही मंत्री अनिल पाटील यांनी दिली. ते म्हणाले, जे मी बोलतो, तेच करतो ते दाखविण्यासाठीच सर्वांना याठिकाणी बोलावलेले आहे. प्रत्यक्ष अमळनेर तालुक्याच्या जनतेने आणि सर्व पत्रकारांनी याठिकाणी यावे कामाची प्रगती पहावी. हाच माझा हेतू आहे. कुणाच्या भुलथापांवर विश्‍वास ठेवू नका, असे आव्हान मंत्री अनिल पाटील यांनी केले. धरण तर पूर्ण होईल पण धरणातून पाणी घ्यावे कसे याची चिंता मला नेहमी सतावत होती. म्हणूनच मी आधी पाणी धरणातून घ्यावे कसे त्याचीही तरतूद करून ठेवलेली आहे. त्यासाठी १५०० कोटी उपसा सिंचन योजनांसाठी मंजूर करून घेतले आहेत. विशेष म्हणजे तापी नदीवरील सर्व प्रकल्पांमध्ये पाडळसे धरणालाच उपसिंचन योजना मंजूर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीसाठी बंद पाईपलाईनद्वारे पाणी जाईल. शेतकरी सुखी होईल, यातच समाधान आहे, असे सांगताना त्यांची धरणाच्या कामाबाबत तळमळ दिसून आली. धरण पूर्ण करण्यासाठी तुमचे भक्कम पाठबळ द्या, असे भावनिक आव्हानही त्यांनी केले.

तालुक्यातील जनतेला आणि पत्रकारांना पाडळसरे धरणाच्या कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटीला आमंत्रित करून मंत्री अनिल पाटील यांनी प्रत्यक्ष कामाची माहिती दिली. तांत्रिक सल्लागार प्रकाश पाटील यांनी धरणाच्या प्रगती पथावर असलेल्या कामाच्या बाबतीत प्रत्यक्ष माहिती दिली. धरणाच्या प्रस्तंभाचे काम मे २०२५ पर्यंत पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले. आज साडेसातशे कोटी धरणासाठी खर्च झालेला आहे. आज सर्वात तापी निम्न प्रकल्पामध्ये सर्वात मोठा प्रकल्प असून त्याचा खर्चही खूप मोठा आहे. केंद्राच्या मदतीशिवाय हे धरण पूर्ण होऊ शकत नाही. धरणाच्या कामासंदर्भात मंत्र्यांची खूप तळमळ आहे. ती मी प्रत्यक्ष बघितली आहे. सकाळपासून त्यांच्या फोनवरून चौकशी सुरुवात होते. धरणाच्या संदर्भातील एवढी तळमळ असलेला व्यक्ती मी कोणी पाहिला नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. असा प्रत्यक्ष अनुभव तांत्रिक सल्लागार प्रकाश पाटील यांनी सांगितला.

उर्वरित ८ प्रस्तंभाचे काम सुरु

धरणाचे २३ प्रस्तंभ आहेत. त्यापैकी १५ प्रस्तंभाचे काम प्रगतीपथावर आहे. उर्वरित ८ प्रस्तंभाचे कामही सुरु आहे. स्तंभांची उंची १०० फुटांपर्यंत असणार आहे. धरणाचे बॅकवॉटर ९२ किलोमीटरपर्यंत आहे. बोरी नदीतही २० किलोमीटरपर्यंत पाणी राहणार आहे. नदीमध्ये २०० किलोमीटरपर्यंत पाणी साचणार असल्याचे प्रकाश पाटील यांनी सांगितले.

यांची होती उपस्थिती

यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य जयश्री पाटील, बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, सरपंच शुभांगी पाटील, अनिल सिसोदे, माजी सभापती शाम अहिरे, पाडळसरे धरण संघर्ष समितीचे सुभाष चौधरी, भाजपचे तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, व्ही.आर.पाटील, संचालक समाधान धनगर, गिरीष पाटील, राजेश पाटील, डॉ. अशोक पाटील यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते. प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील, सूत्रसंचालन विनोद कदम तर आभार महेंद्र बोरसे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here