साईमत, जळगाव : प्रतिनिधी
जिल्हा दूध संघाच्या प्लॅन्टची क्षमता आता ५ लाख लीटर्स प्रती दिन झालेली आहे. त्यामुळे संघाच्या दूध संकलनात जास्तीत जास्त वाढ कशी होईल, यासाठी सर्वांनी सामूहिकरित्या प्रयत्न करणे आवश्यक आहेे. संघ लवकरच स्वतःचे ‘विकास ॲप’ तयार करीत आहे. त्या ॲपद्वारे संस्थांच्या तक्रारी, अडचणी असल्यास त्या त्वरित आणि वेळेवर सोडविण्यासाठी मदत होईल. यापुढे दूध संघाचे कामकाज लोकाभिमुख पध्दतीने चालणार असल्याचे आश्वासन दूध संघाचे चेअरमन आ. मंगेश चव्हाण यांनी दिले. जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची २०२२-२३ या वर्षाची ५२ वी वार्षिक सर्व साधारणसभा रविवारी, २४ सप्टेंबर रोजी संघाचे चेअरमन आ.मंगेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेला ना. गिरीश महाजन, पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, दूध संघाचे संचालक, कार्यकारी संचालक शैलेश मोरखडे तसेच जिल्ह्यातील दूध उत्पादक ४७४ (४५५ + १९) दूध उत्पादक उपस्थित होते.
प्रास्ताविकातून संघाचे चेअरमन आ.चव्हाण यांनी संघाच्या वार्षिक अहवालात संघाने केलेल्या कामगिरीची माहिती उपस्थित दूध उत्पादकांना दिली. त्यांनी प्राथमिक दूध उत्पादक संस्थांनी संघास गुणवत्तापूर्ण जास्तीत जास्त दूध पुरवठा करण्याबाबत आवाहन केले. तसेच यापुढे भविष्यात संघ अद्ययावत स्वयंचलित दूध तपासणी, चाचणी कार्यप्रणाली सॉफ्टवेअरचा अवलंब करुन दूध संकलनाच्या कार्यप्रणालीत बदल करणार आहे. त्याद्वारे दूध शीतकरण केंद्रे, बी. एम. सी. यांच्याकडे संकलीत होणाऱ्या दुधाच्या गुणवत्तेची नोंद करण्यात येणार आहे. तसेच गुणप्रत कमी येण्याबाबत ज्या तक्रारी येत असतात, त्यांना आळा बसण्यास मदत होईल. प्राथमिक दूध उत्पादक संस्थांनी संघास भेसळयुक्त दुधाचा पुरवठा करु नये. कारण दुधाचा प्रत्यक्ष संबंध हा लहान बालकांच्या आरोग्याशी निगडीत असतो. लहान बालकांच्या आयुष्याचा विचार करुन संस्थांनी भेसळयुक्त दूध कधीही स्वीकारु नये, असे ावाहन केले. भेसळयुक्त दूध आढळून आल्यास त्याच्याविरुध्द कडक कायदेशीर कारवाई करण्याचा गंभीर इशाराही आ.चव्हाण यांनी दिला.
दूधात भेसळ करणाऱ्यांची गय नाही
मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, उत्पादकांनी त्यांच्या व्यावसायिक समस्या आणि सूचना सभागृहापुढे मांडाव्या. त्यांचे निराकरण करण्यात येवून समाधानकारक मार्ग काढण्यात येईल. त्यांच्याकडे असलेल्या खात्यामार्फत जिल्ह्यातील दूध उत्पादकांना कोणती व कशा प्रकारे मदत शासनामार्फत होवू शकते याबाबत निश्चित प्रयत्न केले जातील. पश्चिम महाराष्ट्रातील दूध संस्था ज्याप्रमाणे आर्थिक व सर्वांगिणदृष्टया सक्षम झालेल्या आहेत, त्याप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील संस्थाही सर्वांगिणदृष्टया बळकट करुन त्यांना उर्जितावस्थेत आणण्यासाठी तसेच जिल्ह्यातील दूध उत्पादकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील. गुजरात राज्यातही काही डेअरी संस्थांना भेटी दिलेल्या आहेत. त्यांचे कामकाज अतिशय चोख व स्तुत्यप्रिय आहे. त्याप्रमाणे आपल्या संघाच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थाही गुजरात राज्यातील दूध संस्थांप्रमाणे विकसित होणे गरजेचे असल्याचे ना.महाजन यांनी सांगितले. मुंबईसारख्या मार्केटमध्ये भेसळयुक्त, रासायानिक पदार्थापासून तयार केलेले बनावट दुधाची विक्री केली जाते. ही बाब माणसाच्या आरोग्याला घातक व मारक असल्याने दूध उत्पादकांनी अशा मार्गाचा अवलंब करु नये. जो कोणी भेसळ करतांना आढळून आल्यास त्याची गय केली जाणार नाही, असा इशाराही ना.महाजन यांनी दिला. संघाच्या उन्नतीसाठी सर्वांनी हातभार लावून आपले योगदान द्यावे, असे आवाहन केले.
दूध संघाच्या विकासासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत
पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील म्हणाले की, संघाच्या विकासासाठी आपण सर्व एकाच व्यासपीठावर आलेलो आहोत. सर्वांच्या एक विचाराने संघाच्या विकासासाठी आपण प्रयत्न करावेत. यासाठी तालुकानिहाय दूध उत्पादकांच्या प्रत्यक्ष भेटी घेवून त्यांच्या अडचणी व समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी प्रत्येक महिन्यात ४ तालुके निश्चित करुन त्या अनुषंगाने नियोजन करावे, असेही त्यांनी नमूद केले. संघाच्या सर्वांगिण प्रगतीसाठी उपस्थित दूध उत्पादकांनी केलेल्या चांगल्या सूचना व मार्गदर्शन यांचा निश्चतच अवलंब करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री ना. पाटील यांनी उपस्थित दूध उत्पादकांना दिले. तसेच चांगले कामकाज करणाऱ्या संस्था, बचत गट यांना ना.महाजन यांच्या मंत्रालयामार्फत शासनाकडून किमान १५ लाख रुपयापर्यंत मदत करण्याबाबत विचार करावा, असेही पालकमंत्री ना.पाटील म्हणाले.
अजेंड्यावरील उर्वरित सर्व विषयांना मंजूरी
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन तथा संघाचे संचालक संजय पवार यांनी दूध उत्पादकांनी पशुखाद्य पॅकींग, पुरवठा तसेच दुधाची गुणप्रत, दूध घट, वाढ आदी मुद्यांवर विचारलेल्या प्रश्न व समस्यांचे निराकरण केले. संघाच्या वार्षिक सभेच्या अजेंड्यावरील उर्वरित सर्व विषयांना मंजूरी देण्यात आली.
पोटनियम क्रमांक १४.९ मध्ये दुरुस्ती संदर्भात चेअरमन यांनी उपस्थित दूध उत्पादकांना असे आश्वासित केले की, पुढील वर्षापासून ज्या दूध उत्पादक संस्थेचे कामकाज उत्कृष्ट असेल व ज्या संस्थेचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक येईल अशा संस्थेच्या प्रतिनिधीस पुढील एक वर्षाच्या कालावधीसाठी तज्ज्ञ संचालक कामी संघाच्या संचालक मंडळावर कामकाज करण्यास संधी देण्याबाबत विचार करण्यात येईल. या मुद्दयास उपस्थित दूध उत्पादकांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद देवून टाळ्या वाजवून सहमती दिली.
सभेत ‘विकास चहा’च्या विक्रीचा शुभारंभ
संघाच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढवून संघ आर्थिकदृष्टया बळकट करण्यासाठी संघाने ‘विकास चहा भुकटी व विकास दाणेदार चहा’च्या विक्रीचा शुभारंभ सभेत करण्यात आला. त्या अनुषंगाने १००, २०० आणि ५०० ग्रॅम प्रिमिअम पॅकींग अंतर्गत चहा भुकटीची विक्री ऑक्टोंबरपासून सर्वत्र उपलब्ध असणार आहे. संघाच्या वार्षिक सर्व साधारणसभेचे कामकाज शांततेने पूर्ण करण्यासाठी संघाच्या संचालक मंडळ, सर्व सदस्य तसेच संघाचे सर्व विभाग प्रमुख, कर्मचाऱ्यांनी सर्वतोपरी योगदान देवून सहकार्य केले. शेवटी राष्ट्रगीताने सभेची सांगता करण्यात आली.