महिला मंडळाने केले होते कार्यक्रमाचे आयोजन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
शहरातील दादावाडीजवळील कल्याणी नगर येथे माहेरवाशीण कार्यक्रम अतिशय उत्साहात नुकताच पार पडला. दिवाळी म्हटली की, प्रत्येक मुलीला आपल्या माहेरची ओढ लागते. त्या सासरी कामाने थकुन गेलेल्या असतात. म्हणून माहेरी आराम करण्यासाठी मुली येतात. पण त्या एकत्र येत नाही. त्यांनी एकत्र यावे दंगामस्ती, खेळ खेळुन बालपणात रमावे, म्हणून कल्याणी नगर येथील महिला मंडळाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची संकल्पना राधा महाजन, अलका पितृभक्त यांची होती. त्यांना सर्व महिलांनी साथ दिली आणि कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
कार्यक्रमात प्रथमता लेकींचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे सुमंगल महिला मंडळाच्या अध्यक्षा सरला वाणी, ज्योती इंगळे, सुमन बाविस्कर यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन केले. ‘इतनी शक्ती हमे देना दाता’ ही प्रार्थना सर्व मुलींनी गायली आणि वंदन केले. त्यानंतर ‘जन्म बाईचा’ गाण्यावर गौरी महाजन, स्वीटी जाधव, जयश्री वाणी, स्मिता रसाळकर, दीपा रसाळकर, माया शिंपी, पूनम पितृभक्त, स्वाती माळी आणि आयुषी यांनी नृत्य सादर केले.
विविध स्पर्धांचा लुटला आनंद
कार्यक्रमांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यात फुगा बॅलन्स करून लाटण्यात बांगडी अडकवणे त्यात प्रथम पूनम पितृभक्त, द्वितीय राजश्री वाणी, तृतीय स्वाती माळी, स्विटी जाधव यांनी क्रमांक मिळविला. दुसरी स्पर्धा एअर बड्सने कॉईन उलट करणे त्यात प्रथम सुनंदा पाटील, द्वितीय हर्षाली कुलकर्णी, तृतीय माया शिंपी यांनी मिळविला. स्पर्धेचे परीक्षण ज्योती इंगळे यांनी केले.
मनोगतावेळी मुली झाल्या भाऊक
कार्यक्रमाच्या मध्यंतरानंतर मुलींनी आपल्या मनोगतात बालपणीच्या सुखद आठवणी सांगितल्या. यावेळी पूनम पितृभक्त हिने मनोगत व्यक्त केले. मनोगत व्यक्त करतांना मुली खुप भाऊक झाल्या होत्या. कार्यक्रमाचे आकर्षण म्हणजे सरप्राइज गिफ्ट भैय्यासाहेब इंगळे यांनी माहेरची साडी म्हणून एक हजार रुपयाचे तीन सरप्राईज गिफ्ट दिले. त्यात सुवर्णा काटोले, स्मिता रसाळकर, स्वाती माळी यांनी बाजी मारली.
मुलींनी माहेरपणाचा घेतला आनंद
शेवटी धमाल मस्ती डान्स करत मुलींनी माहेरपणाचा आनंद घेतला. सर्व माहेरवाशीणींना गिफ्ट खाऊची पुडी, माहेरची ओटी देण्यात आली. सरते शेवटी सर्वांनी उखाणे घेतले नमस्कार केला आणि अलका पितृभक्त यांच्यामुळे कार्यक्रम अप्रतिम झाला. कार्यक्रमासाठी.डॉ चंद्रशेखर पाटील, सर्व कल्याणी नगरातील महिला मंडळ आणि सर्व ज्येष्ठांचे सहकार्य लाभले.