The Woman Cheated : सोन्याचे दागिने देण्याचे आमिष दाखवून महिलेने १८ लाखात गंडविले

0
27

अमळनेरात घडला प्रकार, ‘त्या’ महिलेवर जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल

साईमत/अमळनेर/प्रतिनिधी : 

मुलाचे लग्न जमवून देईन, पैसे दुप्पट करून देईन आणि सोन्याचे दागिने काढून देण्याचे आमिष दाखवत एका महिलेने १८ लाख रुपयांमध्ये गंडविल्याचा प्रकार शहरातील बंगाली फाईल भागात फेब्रुवारी ते जून महिन्यादरम्यान घडली होती. ‘त्या’ महिलेविरुद्ध जादूटोणा कायद्यानुसार अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी राजेंद्र नारायण माळी (रा. रामवाडी, बंगाली फाईल) यांनी फिर्याद दिली आहे.

सविस्तर असे की, फिर्यादी राजेंद्र माळी यांची आई भटाबाई माळी ह्या १२ फेब्रुवारी २०२५ रोजी महादेव मंदिरात पूजेसाठी गेल्या होत्या. त्यावेळी तेथे तिला मंगला पवार ही महिला भेटली. तिने मुलाचे लग्न जमवून देण्याचे आमीष दाखवून तसेच इतर आमिषे दाखवली. त्या पूजेसाठी २५ हजार रुपये मागितले. त्याच दिवशी रात्री ११ वाजता मंगला त्यांच्या घरी गेली व त्यांना घराच्या मागील भागात सोन्याच्या घागरी असल्याची माहिती दिली. मात्र, ते काढून देण्यासाठी आणखी साडे चार लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर माळी यांनी त्या महिलेला पैसे दिले. हेच पैसे मंगला पवार हिने त्यांच्या घरात धान्याच्या कोठीत ठेवल्याचा बनाव केला. असाच प्रकार वारंवार घडला. असे त्या महिलेने १४ लाख रुपये घेतले आणि प्रत्येकवेळी एक तांब्याची घागर काढून आणली. पुन्हा मार्च महिन्यात तिने अडीच लाख रुपये देवीच्या मुखवट्याजवळ ठेवायला लावले. तेही पैसे ती घरात एकटी जाऊन धान्याचे कोठीत ठेवून आल्याचे सांगितले. मात्र, ती पैसे कोठे ठेवत होती, हे घरच्यांनाही माहित नव्हते. जून महिन्यात तिने पुन्हा सोन्याच्या घागरी आणि सोन्याची देवीची मूर्ती काढण्यासाठी पूजेचे साहित्य लागेल म्हणून दीड लाख रुपये मागितले होते.

…अन्‌ महिलेने साडीत लपविले ८० हजार रुपये

घर मालकाचे पैसे संपले आणि त्यांनी ‘आम्हाला सोने, दुप्पट पैसे नको म्हणून आमचे पैसे कोठीतून काढून द्या’, असे सांगितल्यावर मंगलाबाईने ‘घरात पाच फणी नाग आहे, तुम्ही घरात जाऊ नका’ असे सांगून मनाई केली. त्यानंतर आणखी ८० हजार रुपये मागितले. त्यावेळी परिवारातील सदस्य दीपक माळीने आरशातून पाहिले. तेव्हा मंगलाबाईने ८० हजार रुपये साडीत लपवले. त्यानंतर माळी परिवाराने घरातील धान्याच्या कोठ्या तपासल्या. त्यावेळी तेथे काहीच आढळून आले नाही. त्यानंतर राजेंद्र माळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंगलाबाई पवार हिच्याविरुध्द भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१८(२), ३१६(२) प्रमाणे तसेच महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन अधिनियम २०१३ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here