Bori, Bhokarbari Dam : बोरी, भोकरबारी धरणातील जलसाठा शून्यावर

0
17

धरणांची तहान भागविण्यासाठी आवर्तन सोडले जाणार

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

जुलै महिन्यात सर्वाधिक पाऊस पडतो. मात्र, यंदा मागच्या महिन्यात जळगाव जिल्ह्यात पावसाची तूट दिसून आली. दुसरीकडे जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये जलसाठा मुबलक आहे. गिरणा धरणावरच्या जामदा डाव्या कालव्यातील कॅनाल दुरुस्तीचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. अशातच ऑगस्ट महिना उजाडला असताना गिरणा धरणातील जलसाठा ६६ टक्क्यांवर आला आहे. अशातच बोरी आणि भोकरबारी धरणातील जलसाठा शून्यावर आहे. त्यामुळे गिरणा धरण १०० टक्के भरल्यानंतर आणि कॅनाल दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतरच धरणांची तहान भागविण्यासाठी आवर्तन सोडले जाणार आहे.

जिल्ह्यात दमदार पावसाअभावी ४ ऑगस्टपर्यंत बोरीसह तीन धरणातील जलसाठा शून्यावरच आहे तर नाशिक जिल्ह्यात दमदार पावसाने सातत्य ठेवले आहे. त्यामुळे पुनंद, हरणबारी, केळघर, चणकापूर, ठेंगोडा प्रकल्पातून गिरणा धरणात पाण्याची मोठी आवक झाली आहे.त्यामुळे गिरणा धरणातील जलसाठा ६६ टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे ऑगस्टमध्येही ‘बोरी’ धरणाला आवर्तन मिळण्याची शक्यता कमी आहे. सप्टेंबरच्या मध्यान्हापर्यंत बोरीच्या घशाला कोरड कायम राहण्याची शक्यता आहे.

कॅनाल दुरुस्तीच्या कामाला सुरुवात

एरंडोलच्या अंजनी धरणात ४६.४९ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. गिरणा धरणातून आवर्तन सोडण्यापूर्वीच अंजनी धरणाची पन्नाशीकडे आगेकूच सुरू आहे. त्यामुळे गिरणेच्या आवर्तनातून बोरी धरणाला बूस्टर देण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच म्हसवे तलावातही दोन दिवसात चांगला साठा वाढला आहे. त्यामुळे गिरणेच्या आवर्तनाच्या माध्यमातून म्हसवे तलावातून थेट भोकरबारी धरणात पाण्याचा विसर्ग सुरू होणार आहे. जामदा डाव्या कालव्यावरच्या कॅनालच्या कामाची निविदा संथगतीने पार पडली. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी कॅनाल दुरुस्तीचे काम पूर्णत्वास नेण्याचे नियोजन फसले. कॅनाल दुरुस्तीच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. महिनाभरात काम पूर्णत्वास येणार असल्याचे संबंधितांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here