संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांसह जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
नव्या शासन निर्णयानुसार ग्रामरोजगार सहाय्यकांना तात्काळ दरमहा मानधन द्यावे तसेच ११ महिन्यांचे थकित मानधन मिळावे, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सहाय्यक संघटना जळगाव जिल्ह्याच्यावतीने देण्यात आला आहे. अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांना नुकतेच देण्यात आले.
निवेदनात नमूद केले आहे की, शासनाने १ ऑक्टोबर २०२४ पासून ग्रामरोजगार सहाय्यकांना दरमहा ८ हजार रुपये निश्चित मानधन तसेच इंटरनेट, प्रवास खर्च आणि अल्पोपहार भत्ता म्हणून २ हजार रुपये अशा १० हजार रुपयांच्या मानधनाचा निर्णय घेतलेला आहे. परंतु अशा निर्णयाला आता ११ महिने उलटूनही अद्यापपर्यंत ग्रामरोजगार सहाय्यकांना मानधन मिळालेले नाही. त्यामुळे प्रलंबित असलेले थकित मानधन त्यांच्या वैयक्तिक खात्यावर तातडीने जमा करण्यात यावे, अशी मागणी संघटनेने केली आहे. अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, रोहयो मंत्री भरत गोगावले, प्रधान सचिव गणेश पाटील यांच्याकडे पाठविण्यात आले आहे.
ग्रामरोजगार सहाय्यकांवर मनरेगा योजनेंतर्गत दिवसभर मजुरांची उपस्थिती नोंदविणे, कामांची नोंद ठेवणे, सोशल लेखापरीक्षण (सामाजिक लेखा परीक्षण) यांसह सर्व जबाबदाऱ्या सोपविण्यात आलेल्या आहेत. एवढी जबाबदारी पार पाडूनही त्यांना ११ महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. त्यामुळे अनेक ग्रामरोजगार सहाय्यकांच्या कुटुंबांवर उपजीविकेचा प्रश्न गंभीर झाला असून आत्महत्येची वेळ येत असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटोळे यांनी सांगितले. अशा गंभीर परिस्थितीकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन अन्याय दूर करावा, अन्यथा संपूर्ण राज्यभर प्रत्येक जिल्ह्यातून तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.
शहरातील डॉ.शामाप्रसाद मुखर्जी उद्यानात जिल्हा संघटनेच्या झालेल्या बैठकीत यासंदर्भात ठराव करण्यात आला. नागपूर येथे एक दिवसीय आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला राज्य कार्याध्यक्ष बाळासाहेब तायडे, राज्य संघटक उमेश तायडे, खुशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाली. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष सुरेश पाटोळे होते. बैठकीत जिल्हा उपाध्यक्ष शांताराम जाधव, खुशाल पाटील, बाळासाहेब तायडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक तथा आभार जिल्हाध्यक्ष सुरेश पाटोळे यांनी मानले. आंदोलनाच्या ठरावाचे सूचक बाळासाहेब तायडे तर अनुमोदक शांताराम जाधव होते. बैठकीला जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे तालुकाध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव तसेच मोठ्या संख्येने ग्रामरोजगार सहाय्यक उपस्थित होते.



