साईमत, वरणगाव : प्रतिनिधी
‘आपले शहर – स्वच्छ शहर’ अभियानातंर्गत शहरात ठेकेदारांमार्फत स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. मात्र, हे स्वच्छता अभियान केवळ नावालाच राबविले जात असल्याचे नगर परिषद कार्यालयाजवळच साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरून दिसून येत आहे. त्यामुळे ‘दिव्याखालीच अंधार’ असे म्हणण्याची वेळ शहर वासीयांवर आली आहे. तसेच ठेकेदारामार्फत दिवसाकाठी किमान आठ ते दहा टन कचरा संकलित केला जात असल्याच्या वल्गना केल्या जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
वरणगाव नगर परिषदेच्या माध्यमातून स्वच्छता अभियानातंर्गत ‘आपले शहर-स्वच्छ शहर’ असा नारा देत साई सिध्दी बायोटेक प्रा.लि. या कंपनीमार्फत दैनंदिन स्वच्छता अभियान राबविले जात आहे. यासाठी दहा वाहने व मजुरामार्फत शहराच्या विविध भागातून संकलित केलेल्या ओला व सुका केर कचऱ्याचे मोजमाप करून संकलित करून हा कचरा सिध्देश्वर नगर जवळील घनकचरा प्रकल्पात नेला जातो. दिवसभरात शहरातून किमान आठ ते दहा टन कचरा संकलित केला जात असल्याचे दाखविण्यात येते. प्रत्यक्षात मात्र, शहराच्या विविध भागात केर कचऱ्याचे ढीग असल्याचे दिसून येतात. इतकेच नव्हे तर नगर परिषद कार्यालयाजवळच मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग दिसून येत असल्याने ‘दिव्याखालीच अंधार’ असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसाकाठी किमान आठ ते दहा टन कचरा कोठून संकलित केला जातो? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने याबाबतीत दखल घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
कचरा कुंड्या ठेवल्या जातात केवळ नावालाच
नगर परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता अभियानाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय स्तरावरील पथकाकडून दरवर्षी पाहणी केली जाते. त्यानुसार स्वच्छतेचे बाबतीत नगर परिषदेला गुणांक दिले जातात. मात्र, पथक येणार असल्याची कुणकुण लागताच नगर परिषद प्रशासन व संबंधित ठेकेदाराकडून रात्रंदिवस स्वच्छता मोहीमेला प्राधान्य दिले जाते. तसेच सार्वजनिक ठिकाणी ओला व सुका कचरा संकलीत करण्यासाठी कचऱ्या कुंड्या ठेवून त्याचे फोटोसेशन व पथक माघारी फिरताच कचऱ्याचे संकलनाऐवजी कचरा कुंड्यांचेच संकलन करून त्या नगर परिषदेच्या गोदामात ठेवल्या जातात. इतकेच नव्हेतर केंद्रीय स्तरावरून आलेल्या पथकाची यथेच्छ बडदास्त ठेवली जात असल्याने पथकाकडून नगर परिषद प्रशासन स्वच्छतेच्या बाबतीत चांगले गुणांक आपल्या पदरात घेवून त्याचा मोठ्या प्रमाणात गाजावाजा करतांना दिसुन येतात. दुसरीकडे कचरा कुंड्या अभावी नागरिक व व्यावसायिकांना आपल्या घरातील व दुकानातील केरकचरा सार्वजनिक ठिकाणी टाकावा लागत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच नुकतेच स्वच्छतेच्या बाबतीत शहरातील प्रत्येक घरावर एका कंपनीकडून क्यु-आर कोडचे स्टिकर ठोकले जात असल्याने शहरवासीयांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सार्वजनिक शौचालयाजवळही पसरली अस्वच्छता
हगणदारी मुक्त शहर अभियानातंर्गत शहरात दहा ठिकाणी सुसज्ज असे सार्वजनिक शौचालय उभारण्यात आले आहे. तसेच सार्वजनिक शौचालयाचा दैनंदिन स्वच्छतेचा ठेकाही एका खासगी कंपनीला देण्यात आला आहे. या कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून दैनंदिन शौचालयाची स्वच्छता केली जात असली तरी काही शौचालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण होत आहे. त्यामुळे अनेकांना शौचालयाकडे जातांना दुर्गधींयुक्त वातावरणाचा सामना करावा लागत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.