स्पर्धेत देशभरातील ७२ विद्यापीठांनी नोंदविला सहभाग
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पुरुष मलखांब संघाने अखिल भारतीय आंतरविद्यापीठ मलखांब स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत रौप्य पदक पटकावले आहे. विनायका मिशन फाऊंडेशन अॅण्ड रिसर्च विद्यापीठ, चेन्नई येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातील तब्बल ७२ विद्यापीठांनी सहभाग नोंदविला होता.
अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संघाने उत्कृष्ट समन्वय, शारीरिक ताकद, लवचिकता व कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन करत अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीतही दमदार खेळ साकारत संघाने रौप्य पदकावर आपले नाव कोरले.
यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी खेळाडूंचे कौतुक केले. त्यांनी खेळाडूंशी संवाद साधत स्पर्धेतील अनुभव जाणून घेऊन आगामी स्पर्धांसाठी अधिक मेहनत घेण्याचा सल्ला दिला. तसेच विद्यापीठाकडून खेळाडूंना सर्वतोपरी सहकार्य व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे आश्वासनही त्यांनी दिले. या यशामुळे विद्यापीठाच्या क्रीडा कामगिरीत भर पडली असून उत्तर महाराष्ट्रातील तरुण खेळाडूंना प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
संघात यशस्वी खेळाडूंचा समावेश
यशस्वी संघामध्ये सचिन किशारे जोहरे (पी. ओ. नहाटा महाविद्यालय, भुसावळ), सागर किशाेर चौधरी (जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड मॅनेजमेंट, जळगाव), सारंग जगदिश मालपुरे (के. सी. ई. संस्थेचे शा.-शि. महाविद्यालय, जळगाव), तुषार कैलास जोहरे (पी. ओ. नहाटा महाविद्यालय, भुसावळ), आकाश रवींद्र ठाकरे (एस. एस. व्ही. पी. एस. विज्ञान महाविद्यालय, धुळे) आणि सचिन आनंदा गवळी (झेड. बी. पाटील महाविद्यालय, धुळे) यांचा समावेश होता. खेळाडूंच्या यशाबद्दल प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनीही सर्व खेळाडू, प्रशिक्षक व संघ व्यवस्थापनाचे कौतुक केले असल्याची माहिती विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील यांनी दिली.
