सर्पमित्र नामदेव उज्जैनकर यांचा कोब्रा दंशाने दुर्दैवी मृत्यू
साईमत/मलकापूर / प्रतिनिधी–
यशोधाम परिसरातील सुप्रसिद्ध सर्पमित्र नामदेव विश्वनाथ उज्जैनकर (वय ६७) यांचा गुरुवार रात्री कोब्रा सर्पाच्या दंशामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण मलकापूर शहरात शोककळा पसरली आहे.
सर्पमित्र उज्जैनकर हे अनेक वर्षांपासून विषारी सर्पांना पकडून सुरक्षित स्थळी सोडण्याचे काम करत होते. त्यांनी अनेकदा जीवाची पर्वा न करता कोब्रा, नाग आणि इतर विषारी सर्पांना पकडून जीवनदान दिले. त्यांच्या साहसशील कामगिरीमुळे यशोधाम परिसरासह शहरभर त्यांना ‘सर्पमित्र’ म्हणून ओळख मिळाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, १२ मार्च गुरुवार रात्री सुमारे ११ वाजताच्या सुमारास उज्जैनकर हे गाडेगाव येथे कोब्रा सर्प पकडण्यासाठी गेले होते. सर्प पकडताना कोब्रा सर्पाने त्यांना दंश केला. तातडीने त्यांना मलकापूर येथील काबरा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र रात्री १२.४५ वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
उज्जैनकर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून व नातवंडे तसेच मोठा मित्रपरिवार असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेने शहरातील सर्व नागरिकांना धक्का बसला असून, सर्पमित्राच्या साहस आणि परोपकारी कार्याची आठवण कायम राहील, असे नागरिक व्यक्त करत आहेत.
सर्पमित्राच्या योगदानामुळे मलकापूरमध्ये विषारी सर्पांपासून नागरिक सुरक्षित राहिले, आणि त्यांच्या मृत्यूनंतर परिसरात शोककळा आणि श्रद्धांजली व्यक्त करण्याचा वातावरण पसरले आहे.
