नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील महाबळ परिसरासह काव्यरत्नावली चौक, हतनूर कॉलनी, छत्रपती संभाजी नगर रोड, समता नगर, त्र्यंबक नगर, शकुंतला राणे विद्यालय परिसर ते संत गाडगेबाबा चौकापर्यंत रस्त्यांवर प्रचंड कचरा साचलेला दिसून येत आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात ‘अस्वच्छता’ पसरली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून याठिकाणी नियमित साफसफाई होत नाही. कचरा, प्लास्टिक, कुजलेले अन्न व इतर वस्तूंचा ढीग साचल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे परिसरात डेंग्यू, मलेरिया, टायफॉईडसारख्या आजारांचा फैलाव होण्याचा धोका वाढल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. यासंदर्भात नागरिकांनी सोशल मीडियावर छायाचित्रे आणि व्हिडीओ शेअर करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, संबंधित विभागांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. स्थानिक रहिवासी प्रशासनाकडे तातडीने परिसरातील ‘अस्वच्छता’ दूर करून परिसरात स्वच्छतेची उपाययोजना करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.