छोटा हत्ती चोरणाऱ्या दोघांना पकडले
जळगाव (प्रतिनिधी ) –
तालुक्यातील कुसुंबा येथून मालवाहू छोटा हत्ती चोरी केल्याच्या गुन्ह्यातील दोन चोरट्यांना एमआयडीसी पोलीसांनी मास्टर कॉलनीतून अटक केली या दोघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती मंगळवारी दुपारी पोलीस मुख्यालयातील जनसंपर्क विभागाने दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात दिली आहे.
स्वप्नील राठोड (रा. कुसुंबा) यांचे ९ लाख रूपये किंमतीचे मालवाहू वाहन क्रमांक (एमएच १९ सीएक्स ०३९०) राहत्या घरासमोरून चोरून नेले होते. २२ जानेवारीरोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या तपास पथकाने घटनास्थळ आणि त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात आरोपीने मास्क लावून बनावट चावीने वाहनाचे लॉक उघडल्याचे दिसत होते. यामुळे चोरी करणारा आरोपी फिर्यादीच्या ओळखीचा असावा, असा संशय बळावला.
पोलीसांनी आरोपी असरार शेख मुक्तार शेख (वय 25) आणि मुश्ताक हसन सैय्यद (वय 42, दोन्ही रा. मास्टर कॉलनी) यांना ताब्यात घेतले मुश्ताक सैय्यद हा स्वप्नील राठोड यांच्याकडून नेहमी वाहन भाड्याने घेत होता, त्यानेच बनावट चावी तयार करून मित्र असरार शेख यांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरलेले वाहन जप्त करण्यात आले आहे.