निवडणूक विश्लेषण
गिरीषभाऊ महाजनांची जामनेर मतदार संघावर मजबूत पकड
पंढरीनाथ पाटील/साईमत/जामनेर
नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत जामनेरच्या जनतेने पुन्हा सातव्यांदा गिरीषभाऊ महाजन यांच्यावर विश्वास टाकत त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आहे. गेल्या ३० वर्षापासून गिरीष महाजन यांची मतदार संघावर मजबूत पकड असल्याचे पुन्हा एक सिध्द झाले आहे. तालुक्यातील ग्रामपंचायत ते स्थानिक स्वराज्य संस्था त्यांच्याच ताब्यात आहे. कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांच्याकडे असल्याने अगदी ‘बूथ’ लेव्हलपासून त्यांचे नियोजन असल्याने व कार्यकर्त्यांना दिलेली जबाबदारी ते चोख बजावत असल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. फरक फक्त मतांचा होता. गेल्या अडीच वर्षात महाजन यांनी मतदार संघात विकास कामांचा सपाटाच सुरू ठेवल्याचे दिसून आले. एकंदरीतच गिरीष महाजन यांचे विकासाचे व्हिजन यशस्वी झाल्याचे तालुक्यात सांगितले जात आहे. २००४ नंतर पहिल्यांदाच निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. मात्र, अशा चुरशीतही संकटमोचकांनी आमदारकीची ‘सप्तपदी’ यशस्वी पार केली.
शहरासह तालुक्यात झालेले व सुरू असलेली विकासाची कामे आणि मतदार संघातील लाडक्या बहिणींनी, लाडक्या भावांनी, कर्जबाजारी शेतकऱ्यांनी, बांधकाम कामगार आणि नोकरदार वर्गाने गिरीष महाजन यांना भरभरून मतदान केले. त्यामुळे त्यांना २८ हजार ८८५ मतांचे मताधिक्य प्रतिस्पर्धी उमेदवार दिलीप खोडपे यांचा पराभव करून मिळाले. एक गोष्ट मात्र ह्या निवडणुकीत दिसून आली, ती म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप खोडपे यांना निवडणुकीत जनतेमधून थेट देणगी स्वरुपात आर्थिक रसद पुरविली जात असल्याचे व जनतेनेच ही निवडणूक हातात घेतल्याचे चित्र मतदार संघात शेवटपर्यंत दिसून आले.
विरोधकांच्या तगड्या आव्हानाला ‘भाऊंनी’ दिले प्रत्युत्तर
गेल्या सहा विधानसभा निवडणुकीपेक्षा ही निवडणूक चुरशीची ठरल्याचे जाणकारांचे मत आहे. दोन महिन्या अगोदरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (शरद पवार) प्रवेश केलेले दिलीप खोडपे सरांनी तब्बल एक लाख एक हजार ७८२ मते घेऊन गिरीष महाजन यांच्या पुढे तगडे आव्हान उभे केले होते, यावरून दिसून येते. मतदार संघातील मोठ्या गावांमध्ये गिरीष महाजन यांना मतांची मोठी लीड मिळाल्याने छोट्या गाव खेड्यात मिळालेली मतांची आघाडी खोडपे सरांसाठी कुचकामी ठरल्याचे दिसून येते. गेल्या काही दिवसांपासून मतदार संघात ‘मराठा फॅक्टरचे’ चित्र रंगविल्या गेले. मात्र, त्याचा परिणाम मतपेटीत दिसून आला नाही. मतदार संघात एक लाख ३५ हजार मते हे मराठा समाजाचे असल्याने व दिलीप खोडपे हे मराठा समाजातून येत असल्याने त्यांना जर ही मते एक गठ्ठा मिळाली असती तर खोडपे सर हे मोठ्या मताधिक्याने विजयी ठरले असते. आज त्यांना मिळालेले मतदान हे एकट्या मराठा समाजाचे नाही. त्यात इतर समाजाचे मोठे योगदान आहे. त्यामुळे जामनेर विधानसभा मतदारसंघात फक्त मराठा कार्डचा वापर केला गेला. तो कोणी केला हा संशोधनाचा विषय ठरू शकतो.
गिरीषभाऊंचे राज्य सरकारमध्ये ‘वजन’ वाढले
समाजासाठी शून्य योगदान असलेल्या काही लोकांकडून मराठा समाजात फूट पाडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला गेला त्याचा परिणाम मतदानावर कितपत झाला असेल, हाही एक संशोधनाचा विषय ठरू शकतो, असे एकंदरीत चित्र मतदार संघात दिसून आले. शेवटी गिरीष महाजन यांनी विकासाची गंगा मतदार संघात उतरविल्यामुळेच त्यांचा सातव्यांदा विजय झाला आहे. अपूर्ण राहिलेल्या विकास कामांमुळे गती मिळणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झाल्याने गिरीष महाजन यांचे राज्य सरकारमध्ये अजूनच वजन वाढले अाहे. त्यामुळे त्यांना वजनदार खाते मिळावे, अशी अपेक्षा तालुक्यातून व्यक्त होत आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहे. यंदाच्या जोरदार विजयामुळे तालुक्यात महायुतीचे पारडे अधिकच वजनदार झाले आहे, हेही तेवढेच खरे…!