दहशतवादी कटाचा ‘द केरला स्टोरी’ चित्रपटातून खुलासा – मोदी

0
15

साईमत थिरूवनंतपुरम्‌ (वृत्तसंस्था)-

दहशतवादी कट असलेल्या  कथानकावर आधारित चित्रपट ‘केरला स्टोरी’ सध्या  चर्चेत आहे. हा चित्रपट केवळ एका राज्यातल्या दहशतवादी कटांवर आधारित आहे. केरळ हे देशातलं  सुंदर राज्य आहे. केरळमधले लोक  परिश्रमी आणि प्रतिभावान आहेत. परंतु त्याच केरळमध्ये सुरू असलेल्या दहशतवादी कटाचा खुलासा या चित्रपटाने केला आहे, असे भाष्य आज पंतप्रधशन मोदी यांनी आज केले.
‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच वाद सुरू झाला आहे. केरळ सरकारने या चित्रपटाला संघ आणि भाजपाचा प्रोपगंडा करणारा म्हटलं आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासून काँग्रेसकडूनही सातत्याने प्रतिक्रिया येत आहेत. या चित्रपटावरून वाद सुरू असताना भाजपाकडून सातत्याने या चित्रपटाचं आणि त्यात दाखवलेल्या घटनांचं समर्थन केलं जात आहे. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील या चित्रपटावर बोलले आहेत. नरेंद्र मोदी सध्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आहेत. बेल्लारी येथील प्रचारसभेत नरेंद्र मोदी यांनी ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचा उल्लेख करत काँग्रेसवर हल्लाबोल केला.
पंतप्रधान म्हणाले, बॉम्ब-बंदूक आणि पिस्तूलाचा आवाज ऐकू येतो. परंतु समाजाला आतून पोखरण्याचा आवाज येत नाही. कोर्टानेही आतंकवादाच्या या स्वरुपाबाबत चिंता व्यक्त केल्या आहेत. परंतु देशाचं दुर्भाग्य बघा. समाजाला उद्ध्वस्त करणाऱ्या या दहशतवादी प्रवृत्तीच्या पाठीशी काँग्रेस उभी आहे.
नरेंद्र मोदी म्हणाले, काँग्रेस दहशतवादी प्रवृत्ती असलेल्या लोकांशी मागल्या दाराने राजकीय सौदेबाजीदेखील करत आहे. म्हणूनच कर्नाटकमधील लोकांनी  काँग्रेसपासून सावध राहिलं पाहिजे. हे लोक चित्रपटावर बंदी आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मी काँग्रेसला असं काही करताना पाहतो तेव्हा मला आश्‍चर्य वाटतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here