साईमत, भडगाव : प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जळगाव जिल्हा क्रीडा कार्यालय तथा भडगाव तालुका क्रीडा समितीच्या संयुक्त विद्यमाने आदर्श कन्या विद्यालय, भडगाव येथील क्रीडांगणावर भडगाव तालुकास्तरीय मुलींच्या कबड्डी स्पर्धा खेळाडूंच्या मोठ्या उत्साहात घेण्यात आल्या. स्पर्धेचे उद्घाटन महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ, भडगावचे सचिव दीपक महाजन यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी आदर्श कन्या विद्यालयाचे प्राचार्य सुरेश रोकडे, पर्यवेक्षक शामकांत बोरसे तसेच तालुक्यातील विविध शाळेतून आलेले क्रीडा शिक्षक, व्यवस्थापक, प्रशिक्षक उपस्थित होते.
स्पर्धेत १४ वर्षाआतील मुलींच्या गटात ब.ज.हिरण, कजगावच्या संघाने प्रताप विद्यालय, वडगाव विरुध्द विजय मिळविला. वडगाव संघ उपविजयी ठरला तर तिसऱ्यास्थानी जवाहर हायस्कूल, गिरडच्या संघाने यश मिळविले तर १७ वर्षाआतील गटात आदर्श कन्या विद्यालय, भडगावच्या संघाने चुरशीत पार पडलेल्या अंतिम सामन्यात माध्यमिक विद्यालय, गुढे संघाचा पराभव करत जेतेपद प्राप्त केले. गुढ्याच्या संघास उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले तर याच गटात जवाहर हायस्कूल, गिरड या संघाने तृतीय स्थान प्राप्त केले. १९ वर्षाआतील गटात आदर्श कन्या विद्यालय, भडगावच्या संघाने टी.आर.पाटील, कनिष्ठ महाविद्यालय, वडजी संघाविरुध्द एकतर्फी विजेतेपद प्राप्त केले. वडजी संघास उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी क्रीडा समन्वयक प्रा.डॉ.सचिन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षक प्रा.सतीश पाटील, अरुण राजपूत, महेंद्र पाटील, राकेश पाटील, दीपक पाटील, अमीत पाटील, सखाराम वाघ, भिमसिंग परदेशी, गोपाल देशमुख, तुषार पवार, श्री.चौधरी, निलेश मोरे, रवींद्र महाजन, प्रशांत सोळुंके, राष्ट्रीय पंच प्रा.प्रेमचंद चौधरी तसेच आदर्श कन्या विद्यालयाच्या खेळाडूंनी परिश्रम घेतले. सुत्रसंचलन तथा आभार डॉ.प्रा.सचिन भोसले यांनी मानले.