धानोरा विद्यालयातील शिक्षक एस.एस.पाटील यांचा आदर्श उपक्रम
साईमत/धानोरा, ता.चोपडा/प्रतिनिधी:
धानोरा येथील सातपुडा शिक्षण संस्था संचालित कै.झिपरु तोताराम महाजन माध्यमिक विद्यालय व नामदेव भावसिंग पाटील उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक एस.एस.पाटील यांनी तीन वर्षांपूर्वी पितृछत्र हरपलेल्या किरण उमेश कोळी या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक खर्चाची संपूर्ण जबाबदारी उचलली आहे. त्यांच्या निर्णयाचे धानोरा परिसरातून कौतुक होत आहे.
धानोरा येथील उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवीचा विद्यार्थी किरण कोळी याच्या वडिलांचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळे घराचा संपूर्ण भार आणि मुलाची शैक्षणिक जबाबदारी एकट्या त्याच्या आईवर आली होती. ही गोष्ट विद्यालयातील शिक्षक एस.एस.पाटील यांच्या कानावर आली. अशावेळी त्यांनी किरणचा संपूर्ण शैक्षणिक खर्च तसेच त्याला लागणारे शालेय साहित्य आणि वर्षभराची शैक्षणिक फी भरण्याचा एक धाडसी निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयाने परिसरात आदर्श निर्माण झाला आहे. नुकतेच किरणला शालेय साहित्य देण्यात आले. यावेळी विद्यालयातील उपमुख्याध्यापक नवल महाजन, शिक्षक सी.बी. सोनवणे, देविदास महाजन, उषा भील, योगिता बाविस्कर, एकता भांबरे, ए.पी.शिरसाट उपस्थित होते.
वर्षभर राबवितात विविध उपक्रम
धानोऱ्यातील उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक एस.एस.पाटील हे विद्यार्थ्यांना विविध शालेय साहित्याचे वर्षभरात वाटप करतात. त्यामुळे त्यांची विद्यार्थी, शिक्षक म्हणून शाळेत ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या उपक्रमाचे पालक वर्गातून कौतुक होत आहे.