अग्निशामक यंत्राचा वापर करून विझवली आग
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात सोमवारी, २९ सप्टेंबर रोजी शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. प्रसंगावधान राखून अधिपरिचारिका ज्यूलीना पिंपळसे आणि सुवर्णा पुरी यांनी तात्काळ आग विझविण्यास अग्निशामक यंत्रांचा वापर केला. अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी घटनेची दखल घेऊन दोन्ही अधिपरिचारिकांना दालनात बोलावून त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्मेंद्र पाटील, सहयोगी प्रा. डॉ. संगीता गावित, सहायक अधिसेवक तुषार पाटील उपस्थित होते.
घटनेवेळी प्रसुतीपूर्व दाखल कक्ष क्रमांक ६ मध्ये गरोदर माता व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. मुख्य दरवाजाजवळील स्विच बोर्डाजवळ स्पार्किंग होताच कर्मचाऱ्यांनी अधिपरिचारिकांना माहिती दिली. त्यांनी तत्काळ विभागातील दोन अग्निशामक यंत्र उचलून आग नियंत्रणात आणली.तसेच उपस्थित रुग्णांसह नातेवाईकांना घाबरून न जाण्याचे समजावले. अधिपरिचारिकांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली असल्याने ही बाब कौतुकास्पद ठरली आहे.