साईमत, भुसावळ : प्रतिनिधी
लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारिता आहे. पत्रकार, पोलीस व प्रशासन यांच्यात ऋणानुबंध असतात. समाजातली प्रकाशी व अंधारी बाजू पत्रकाराला माहिती असते. त्यामुळे प्रत्येक बाबींवर लक्ष ठेवून सर्वसामान्य लोकांचे दुःख आपल्या लेखणीतून पत्रकार व्यक्त करत असतात. हे दुःख पोलीस, प्रशासन व न्यायव्यवस्थेकडे आल्यानंतर लोकांना न्याय मिळत असतो. त्यामुळे सर्वसामान्यांचे दुःख आपल्या लेखणीतून व्यक्त करणारा पत्रकार हा लोकशाहीतील एक प्रमुख व महत्त्वपूर्ण घटक असल्याचे प्रतिपादन भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांनी केले.
भुसावळ येथील शहर पत्रकार संस्थेतर्फे पंचायत समिती हॉलमध्ये ६ जानेवारी पत्रकार दिनानिमित्त नवरत्न सन्मान व पत्रकार सन्मान सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भुसावळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे होते. प्रमुख वक्ते म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे तर प्रमुख पाहुणे म्हणून व्हाईस ऑफ मीडियाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश उज्जैनवाल, जिल्हाध्यक्ष मिलिंद टोके, व्हाईस ऑफ मीडियाच्या ऊर्दू विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष हारुन नदवी तसेच भुसावळ शहर पत्रकार संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष सरकारी वकील ॲड. नितीन खरे, माजी अध्यक्ष श्रीकांत जोशी, विद्यमान अध्यक्ष प्रेम परदेशी, सचिव हबीब चव्हाण, प्रकल्प प्रमुख सुनील आरक यांची उपस्थिती होती. प्रारंभी दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू करणारे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
प्रास्ताविकात शहर पत्रकार संस्थेचे अध्यक्ष प्रेम परदेशी यांनी संस्थेच्या आतापर्यंतच्या कार्याचा आढावा घेऊन पत्रकारांची भूमिका समाजासाठी लाभदायी असल्याचे सांगितले. प्रा. प्रवीण पाटील यांनी पत्रकारांचे समाजातील महत्त्वपूर्ण स्थान सांगून प्रत्येक क्षेत्रातील सकारात्मक बाबी दर्शविणारे पत्रकार असतात, असे सांगितले. अध्यक्षीय मनोगतात मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी पत्रकारांच्या कौशल्यपूर्ण लेखणीचे कौतुक करून स्वतःचे दुःख विसरून इतरांचे दुःख दूर करण्यासाठी पत्रकार सातत्याने कार्य करत राहतो. त्यामुळे पत्रकारांचे उत्तम समाज निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन तथा आभार डॉ. नरेंद्र महाले यांनी मानले.
डॉ. जगदीश पाटील यांना कार्यगौरव सन्मानपत्र
भुसावळ शहर पत्रकार संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही पत्रकारितेसह इतर क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या डॉ. जगदीश पाटील यांचा संस्थापक-अध्यक्ष ॲड. नितीन खरे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यगौरव सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सन्मानपत्राचे शब्दांकन व वाचन माजी अध्यक्ष श्रीकांत जोशी यांनी केले. त्यात त्यांनी डॉ. जगदीश पाटील यांच्या सर्वांगिण कार्याचा आढावा घेतला.
नवरत्न सन्मान सोहळा
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नऊ व्यक्तींना नवरत्न सन्मान देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रकल्प प्रमुख सुनील आराक यांनी सत्कारार्थी नवरत्नांच्या कार्याचा परिचय करून दिला. बद्रीनारायण अग्रवाल यांना उद्योगरत्न, निरंजना तायडे यांना नारीरत्न, प्र. ह. दलाल यांना शिक्षकरत्न, निर्मल उर्फ पिंटूभाऊ कोठारी यांना समाजरत्न, प्रा. प्रवीण फलक यांना क्रीडारत्न, किरण चोपडे यांना कृषीरत्न, डॉ. सुरेंद्र भिरूड यांना धन्वंतरी रत्न, अनिल कोष्टी यांना कलारत्न तर ॲड. जगदीश कापडे यांना विधीरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पत्रकारांचा सन्मान
समृद्ध समाजाच्या निर्मितीसाठी अखंडितपणे काम करणाऱ्या पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यात प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया व सोशल मीडिया यात काम करणाऱ्या पत्रकारांचा समावेश होता.
यशस्वीतेसाठी अध्यक्ष प्रेम परदेशी, सचिव हबीब चव्हाण, प्रकल्प प्रमुख सुनील आराक, सतीश कांबळे, श्रीकांत सराफ, कमलेश चौधरी, सद्दाम खाटीक, ऑलवीन स्वामी, आकाश ढाके, विनोद गोरधे, अभिजीत आढाव, संतोष शेलोडे, निलेश फिरके, विशाल सूर्यवंशी, सलाउद्दीन आदिब, अझहर शेख, मझहर शेख, राजू चौधरी, कलिम शेख पायलट, नरेंद्र पाटील, प्रकाश तायडे, शकील पटेल, नाना पाटील यांच्यासह पत्रकारांनी परिश्रम घेतले.